आंबा निर्यातीला ब्रेक

आंबा निर्यातीला ब्रेक

नाशिक । प्रतिनिधी

खास चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणार्‍या भारतीय आंब्याने विशेषतः महाराष्ट्रातील आंब्याने अमेरिकावासीयांना भुरळ पाडलेली आहे. त्यामुळे कोकणातील आंब्याची अमेरिका ही मोठी बाजारपेठ म्हणून पुढे आली आहे. मात्र,कोविड-19 मुळे सलग दुसर्‍या वर्षी भारतातून आंब्याची निर्यात झाली नसल्याने आंबा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

सलग दोन वर्ष आंबा निर्यातीला कोविड मुळे ब्रेक बसला आहे. सन 2019 लासलगावमार्गे अमेरिकेला आंबा निर्यात सुरू झाली. लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये हापूस आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून आंबा पाठविण्यात आला. अमेरिकेत आंबा जाण्यापूर्वी निर्यातपूर्व विकिरण प्रक्रिया करण्यासाठी संपूर्ण भारतातून आंबा लासलगाव येथे आणला जातो.

मात्र, लासलगाव येथील कृषक केंद्राची क्षमता अधिक असल्याने मुख्यत्वे लासलगाव केंद्र महत्त्वपूर्ण आहे. याठिकाणी गॅमा किरणांचा मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढविली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच शिवाय कोयीतील कीड नष्ट होण्यास मदत होते. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणाही टिकून राहतो.

आंब्याच्या होणार्‍या निर्यातीकरिता अमेरिकेच्या निर्यात धोरणानुसार विविध निकष देण्यात आले असून, त्यांच्या नियमानुसार ही आंब्याची निर्यात करण्यात आली आहे. यासाठी अमेरिका कृषी विभाग व भारत सरकार यांचे प्रतिनिधी फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र देऊन याबाबत कामकाज पाहत आहेत.

लासलगाव येथून अमेरिकेला झालेली निर्यात

वर्ष- निर्यात (टनात)

2015- 350

2016- 544

2017- 567

2018- 490

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com