
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्ह्यातील सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गांची व इतर रस्त्यांची त्वरित डागडुजी करावी. याबाबत त्वरित निर्णय न झाल्यास टोल आकारू नये, असा निर्णयवजा इशारा नाशिक इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) तर्फे निमा सभागृहात आयोजित उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी आणि नागरिकांच्या प्रमुख 26 संघटनांच्या संयुक्त बैठकीत देण्यात आला.
वाहतुकीच्या मार्गात अडथळे ठरणारे अतिक्रमण काढावेत, हवाई सेवेचे व्यापक जाळे विणावे तसेच नाशिकहून मुंबईसाठी जलद रेल्वे सेवा सुरू करावी आदी बाबींसहित नाशिक जिल्ह्याच्या विकासाला पूरक अनेक मागण्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष, क्रेडाईचे हितेश पोद्दार, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य, निपमचे हेमंत राख, चेंबरचे कांतीलाल चोपडा, लघु उद्योग भारतीचे विवेक कुलकर्णी, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, तानचे सागर वाकचौरे, प्रॅक्टिशनर इंजिनिअर असोसिएशनचे अनिल कडभाने, आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत उपस्थित सर्व प्रतिनिधींच्या भावना खूप तीव्र दिसल्या. आपण सर्व टोल भरतो त्या तुलनेने रस्ते चांगले नसतील तर त्याचा उपयोग काय. मुंबईला जायला जर आठ-आठ तास लागत असतील तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे असा संतप्त सवाल करून रस्त्यांची डागडुजी लवकर न झाल्यास शासनाने स्वतःहून या मार्गांवरील टोल बंद करावे, असा एकमुखी निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
नाशिक हे लॉजिस्टिकचे राष्ट्रीय हब व्हावे अशी जी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे त्याचा गांभीर्याने विचार व्हावा, शिंदे पळसे टोल नाक्यावर मनुष्यबळ वाढवावे, सीबीएससी सहित इतर काही रस्त्यावर राईट टर्न सुरू करावा. उद्योजक आणि व्यापार्यांच्या विविध मागण्यांच्या पाठपुरावासाठी सातत्याने बैठका घेण्याचे तसेच दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी झाला.
बैठकीस निमाचे कोषाध्यक्ष विरल ठक्कर, राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत, कैलास पाटील नरेश पारख, गिरीश नवसे,,नंदन दीक्षित, सचिन पाटील,सचिन बागड, हितेश पोद्दार, मनोज वासवानी, आनंद सूर्यवंशी, राजेंद्र फड, संजय सोनवणे अमित अलई, मनीष रावल, किरण वाजे, गोविंद झा, दिलीप वाघ,सुधाकर जाधव,सागर देवरे,श्रीकांत पाटील,सुभाष जांगडा, निखिल तापडिया, संजय राठी, वैभव चावक,सतीश कोठारी यांच्यासह नाईस, निपम,निवेक,लघुउद्योग भारती, तान, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, सराफ असोसिएशन, निर्यातदार संघटना आदी सहित नाशिक मधील सर्व प्रमुख 26 संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.