सेवाग्राम एक्सप्रेसला आजपासून नांदगाव थांबा

सेवाग्राम एक्सप्रेसला आजपासून नांदगाव थांबा

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

लॉकडाऊन काळात अनेक रेल्वे गाड्यांचा थांबा नांदगाव रेल्वे स्थानकावर रद्द करण्यात आला होता. मात्र, आता लॉकडाऊन कमी झाले असून नांदगाव येथील प्रवाशांची मागणी लक्षात घेता नांदगाव येथे शुक्रवार (दि. २१) पासुन सेवाग्राम एक्स्प्रेसला थांबा देण्यात आल्याची माहिती खा. डॉ. भारती पवार यांनी दिली.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात रेल्वे सेवा बंद असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. त्यानंतर लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतरही कोवीड-१९चा धोका असल्याने काळजी म्हणून काही कोवीड स्पेशल रेल्वेच धावत होत्या.

परंतु त्यांचा थांबा हा प्रत्येक स्टेशनवर नसल्याने अनेक प्रवासी नागरिकांची गैरसोय होत होती. याचा फटका नांदगाव रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना बसत होता याची दखल घेत खा. डॉ. भारती पवार यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करत अडचण समजून सांगत त्या ठिकाणी कमीत कमी ३ ते ४ गाड्या तरी सुरू कराव्यात म्हणून मागणी केली.

मुंबईकडे जाण्यासाठी कुठलीच रेल्वे नसल्याने प्रवाशांना प्रवासासाठी अनंत अडचणी येत होत्या. या मागणीचा विचार करत रेल्वे मंत्रालयाने तातडीने सेवाग्रामला थांबा देण्याचे नोटिफिकेशन काढले आहे.

काही अंशी का होईना नांदगावहुन मुंबई मार्गावरील जाणाऱ्या प्रवाशांची अडचण दूर होणार आहे. टप्प्या टप्प्याने पुढील रेल्वे सुद्धा सुरू करणार असल्याचे आश्वासन रेल्वे महाव्यवस्थापकांनी दिले असल्याचे खा. डॉ. भारती पवारांनी सांगितले. सेवाग्रामला नांदगाव येथे थांबा दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com