सूक्ष्म नियोजनातून करोनाला अटकाव करा

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या सूचना
सूक्ष्म नियोजनातून करोनाला अटकाव करा

नाशिक | Nashik

करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी बाधित रुग्ण शोधून त्यावर वेळेत उपचार होणे अत्यावश्यक आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. या मोहिमेद्वारे सूक्ष्म नियोजन करून करोनाच्या आपत्तीला अटकाव आणणे आवश्यक आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. या मोहिमेबाबत जनतेला आवाहन करा तसेच हेल्पलाईन तयार करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, तहसीलदार राजेंद्र नजन आणि जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या माझी वसुंधरा योजनेच्या अमलबजावणीसाठी समिती गठीत करणे आवश्यक आहे. पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि अग्नी या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करावयाचे आहे.

ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रभावीपणे नियोजन करण्यात यावे. शासकीय जमिनींबाबत विषय असल्यास तातडीने प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवावे तसेच ज्या विकासकामांना मंजुरी दिलेली आहे त्यांचे लेखापरीक्षण वेळोवेळी करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिले.

घनकचरा व्यवस्थापनातुन स्रोत पुनरप्राप्ती केंद्र (resource recovery centre) उभारणेसाठी प्रयत्न करण्यात यावे. पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात यावा.

या योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी संधी मिळणार आहे; त्यामुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी उपस्थित मुख्याधिकाऱ्यांना दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com