
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील किमान दहा ठिकाणच्या जत्रां-यात्रां मध्ये देवाची नवसपूर्ती म्हणून जत्रेच्या कालावधीत उघड्यावर पशूबळी दिले जातात.
हे थांबवण्यासाठी आत्तापासूनच त्या त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक (Restrictive boards) लावावेत व प्रत्यक्ष जत्रेच्या कालावधीत उघड्यावर दिल्या जाणाऱ्या पशुबळीविरोधात असलेल्या न्यायालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी व्हावी, अश्या मागणीचे निवेदन (memorandum) महाराष्ट्र अंनिसच्या (Maharashtra Annis) नाशिक जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी (Collector), नाशिक यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सिन्नर तालुक्यातील (sinnar taluka) वडांगळी, दोडी बुद्रुक तसेच जिल्ह्यातील अन्य काही तालुक्यांतील किमान दहा गावांमधून भरणाऱ्या देवदेवतांच्या जत्रां- यात्रांमधून देवाच्या नावाने नवसपूर्ती म्हणून भाविक - भक्त मोठ्या प्रमाणात उघड्यावर पशू - पक्षांचा बळी देतात. अशा अंधश्रद्धायुक्त (Superstition) आणि कालबाह्य अनिष्ट, अघोरी प्रथा, परंपरा जपल्याने, जोपासल्याने समाज अधिकाधिक दैववादी बनत जातो आणि आर्थिक शोषणासोबतच मानसिक गुलामगिरीत गुरफटत जातो.
वर्षानुवर्षे नवस करणारा आणि तो परंपरेनुसार फेडणारा मोठा वर्ग हा आजही आहे त्याच दैन्यावस्थेत आहे. पशूबळीच्या या अनिष्ट, अघोरी प्रथेपायी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात खिळखिळी होत असते. म्हणून गरीबांना अधिक गरीबीत ठेवण्याचेच हे कुटील कारस्थान आहे, असे अंनिसचे म्हणणे आहे.अशा कालबाह्य व अघोरी प्रथा जोपासल्याने संत - समाजसुधारकांच्या कृतिशील विचारसरणीशी विसंगत वर्तन समाजाकडून वारंवार घडते . तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनतेकडे झुकण्याचा धोका निर्माण होतो.
याविरुद्ध अंनिसने प्रबोधन- सत्याग्रह- संघर्षाच्या मार्गाने मागील २६ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सातत्याने प्रयत्न करून, या अनिष्ट, अघोरी प्रथेला काही अंशी पायबंद घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात अंनिसला बऱ्यापैकी यश मिळालेले आहे. महाराष्ट्रातील अशा जवळपास १५० पेक्षा अधिक जत्रा- यात्रांमधून पशूबळी ही अनिष्ट प्रथा पूर्णपणे थांबविण्यात महाराष्ट्र अंनिसला यश आलेले आहे.अजूनही प्रत्यक्षात जत्रेत उघड्यावर दिला जाणाऱ्या पशुबळी विरोधात कायदा असूनही, त्याची प्रत्यक्षात काटेकोरपणे अंमलबजावणी संबंधितांकडून होताना दिसत नाही.
आदेशाची अंमलबजावणी व्हावी म्हणून समितीने यापूर्वी वेळोवेळी जिल्हा व पोलिस प्रशासनाला विनंती पत्रंही दिलेली आहेत.न्यायालयाच्या आदेशाचे ठळक अक्षरातील फलक त्या त्या जत्रास्थळी सुस्पष्ट दिसतील,अशा ठिकाणी कायमस्वरूपी लावावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. संबंधित देवदेवतांच्या जत्रां त्या त्या ठिकाणी माघपौर्णिमेच्या मागेपुढे तीन ते दहा किंवा त्याहून अधिक दिवस भरतात. यावर्षी रविवार दि. ५ फेब्रुवारीला माघ पौर्णिमा आहे. त्यावेळी या जत्रांमधून देवाची नवसपूर्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उघड्यावर पशुबळी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
म्हणून ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा पशूबळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जत्रा - यात्रा भरतात, त्या ठिकाणी सदर कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी. तसेच , " उघड्यावरील पशूबळीला प्रतिबंध," अशा आशयाचे फलक संबंधितांनी लावावेत, तसे आदेश आत्तापासूनच जिल्हा अधिकारी यांनी निर्गमित करावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे.,राज्य कार्यवाह डॉ.सुदेश घोडेराव, जिल्हा बुवाबाजी विरोधी संघर्ष सचिव महेंद्र दातरंगे यांच्या सह्या आहेत.