
दहिवड | प्रतिनिधी | Dahiwad
सोशल मीडिया हे आजच्या युगात संवादाचे सर्वात मोठे माध्यम असून माणसाच्या दैनंदिन जीवनाचा तो एक अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. सोशल मिडीयाचा प्रभावी वापर केला तर तो अनेकदा फायद्याचा ठरतो. याचा प्रभावी वापर करून एका शेतकऱ्याने आपला चोरीला गेलेला ट्रॅक्टर पुन्हा मिळवण्यात यश मिळवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा तालुक्यातील उमराणे येथील दर्शन कांदा आडतसमोर एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह (एमएच 41डी 2984) दि. २२ में रोजी उमराणे येथून चोरट्यांनी पळवला होता.
ट्रॅक्टर मालक सुभाष आहिरे (सुराणे ता. सटाणा) यांनी व परिसरातील नागरिकांच्या मदतीने शोध घेतला असता चिंचवे येथील जिओ पेट्रोल पंपावर चोरट्यानी ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरले हे पेट्रोलपंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले.
हे फुटेज सोशल मीडियावर झळकताच चोरट्याना याबाबत भनक लागली. ट्रॅक्टर नाशिकच्या पुढे विल्होळी शिवारात रात्रीच्या सुमारास सोडून चोरटे फरार झाले. परिसरातील काही तरुणांनी ट्रॅक्टर मालकास कळविले असता ट्रॅक्टर मालकाने देवळा पोलीसाच्या मार्गदर्शनातून त्या परिसरातून ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेतली.
देवळा येथे पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर जमा केले असून पोलीस इनस्पेक्टर समीर बारवकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित समाधान चिंधा ठाकरे (झाडी) व निलेश नानाजी देवरे (महालपाटणे) यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत.