खतांचा साठा उपलब्ध करावा

खतांचा साठा उपलब्ध करावा

नाशिक जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांची मागणी

येवला । प्रतिनिधी

यंदाही रासायनिक खतांच्या किमती वाढवून नवीन दराने खत विक्री करण्याचे सूतोवाच केले जात आहे. शासनाने रासायनिक खतांच्या वाढीव किमती कमी करून पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नाशिक जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी केली आहे.

बेभरवशाची शेती, त्यात रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडत आहेत. शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. मात्र रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतींमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. केंद्र शासनाने पाऊस सुरू होण्याच्या अगोदर खतांचा पुरेसा साठा भाववाढ न करता उपलब्ध करून देण्याची गरज असताना ही भाववाढ कशासाठी?

यावर्षी कधी नव्हे ते रासायनिक खतांचे एकाच वेळी जवळपास दीड पटीने भाव वाढले. आतापर्यंत किरकोळ 50/100 रुपयांची भाववाढ व्हायची ती शेतकरी सहन करून गप्प राहायचे; परंतु आता ही दरवाढ जाचक आहे. मात्र एक एप्रिलपासूनच्या होणार्‍या उत्पादनाची भाववाढ होईल, असे काही वर्तमानपत्रांत जाहीर झाल्यानंतर केंद्रीय खत व रसायनमंत्री यांनी जाहीर केले की, अशी भाववाढ होणार नाही.

परंतु आता जे खत येत आहे ते नवीन भावाचे खत आहे. ते भाव दीड पटीने वाढलेले आहेत. उदा. डीएपी पूर्वी 1,200 रुपयाला मिळायचे ते आता 1,900 रुपयांना मिळेल. जे 12-32-16 खत 1,175 रुपयांना मिळायचे ते आता 1,800 रुपयाला मिळेल. खत कंपन्यांनी एका बाजूला खताचे भाव वाढवले व दुसर्‍या बाजूला किरकोळ खत विक्रेत्यांचे कमिशन कमी केले.

उदाहरणार्थ जुने 12-32-16 ची किंमत 1,175 रुपये होती व त्यांना 1,120 रुपयाला मिळायचे. 55 रुपये नफा व्हायचा. आता ते खत 1,800 रुपयाला विकतील अन् त्यांना 1,780 रुपयाला मिळेल. म्हणजे त्यात फक्त 20 रुपये नफा मिळेल. याबाबत पालकमंत्री, कृषिमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी बनकर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com