'स्टाईस'च्या निवडणूकीचा मार्ग मोकळा

सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे उच्च न्यायालयात शपथपत्र
'स्टाईस'च्या निवडणूकीचा मार्ग मोकळा

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

‘स्टाईस’ची निवडणूक प्रक्रिया ( STICE Election Process )ज्या टप्प्यावर थांबवली होती, त्या टप्प्यापासून पुढील प्रक्रिया 6 मे 2022 पासून पुन्हा सुरु केली जाईल’ असे शपथपत्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने उच्च न्यायालयात दिले. त्यामूळे संस्थेचे माजी संचालक नामकर्ण आवारे यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या द्वीसदस्यीय खंडपीठाने बुधवारी (दि.4) निकाली काढली.

‘स्टाईस’च्या संचालक मंडळाची मुदत 9 ऑगस्ट 2020 रोजी संपली होती. मात्र, कोरोना महामारीच्या संकटामूळे राज्यातील सर्वच निवडणूका पुढे ढकलण्यात आल्याने ‘स्टाईस’चीही निवडणूक पूढे ढकलण्यात आली. त्यानंतर तत्कालीन चेअरमन पंडित लोंढे यांच्याशी झालेल्या मतभेदामूळे नामकर्ण आवारे यांच्यासह 6 संचालकांनी राजीनामा दिल्याने संचालक मंडळ अल्पमतात आले.

संस्थेचा कारभार पाहण्यासाठी एकूण संचालकांच्या दोन तृतियांश अर्थात 8 संचालक शिल्लक न राहिल्याने 23 जून 2021 रोजी संस्थेवर संजीव शिंदे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आमदार माणिकराव कोकाटे यांनी सहकार मंत्र्यांकडे पाठपुरावा करुन सुधा माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय प्रशासकीय मंडळ 10 ऑगस्ट 2021 रोजी मंजूर करुन आणले.

या प्रशासकीय मंडळाचा 6 महिण्यांचा कार्यकाळ 10 फेब्रुवारी 2022 रोजी पूर्ण होणार होता. मात्र, त्यापूर्वीच 24 डिसेंबर 2021 रोजी मतदार यादी प्रसिध्दीचा कार्यक्रम संस्थेच्या फलकावर जाहिर करण्यात आला. या तात्पुरत्या मतदार यादीवर 7 ते 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत 4-5 सभासदांनी आपल्या हरकती जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांकडे अर्थात जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल केल्या.

त्यावर सुनावणी होण्यापूर्वीच 17 फेब्रुवारी 2022 ला प्रशासकीय मंडळाला पुन्हा सहा महिण्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या सहकार विभागाने घेतला. त्यामुळे निवडणूक प्राधिकरणाने आलेल्या आक्षेपांवर कुठलीही कार्यवाही केली नाही. प्राधीकरणाने 25 फेब्रुवारीपर्यंत हरकतींवर निर्णय देणे अपेक्षित होते. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ही प्रक्रिया कुणालाही थांबवता येत नाही. असे असतांना प्राधिकरण अंतिम सुनावणी करण्यासाठी तारखेची घोषणा करत नसल्याने आवारे यांनी 16 फेब्रुवारीपासून चार वेळा प्राधिकरणाला स्मरणपत्र पाठवून अंतिम सुनावणी लावण्यासाठी पाठपुरावा केला.

राजकीय दबावाला बळी पडून प्राधिकरण सुनावणीची तारीख जाहीर करीत नसल्याचे आवारे यांचे स्पष्ट मत झाले व त्या विरोधात 9 मार्च 2022 रोजी त्यांनी उच्च न्यायालयात यासाठी याचिका दाखल केली. 24 डिसेंबर 2021 रोजी प्रसिध्द झालेल्या मतदार यादीचा कार्यक्रम त्वरीत पूर्ण करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्राधिकरणला आदेश करावा व निवडणूकीचा कार्यक्रम तात्काळ जाहीर करावा अशी मागणी आवारे यांनी याचिकेत केली होती. त्यावर न्या. रेवती मोहिते-डेरे, न्या. माधव जमादार यांच्या खंडपिठाकडे सुनावणी सुरु होती.

बुधवारी (दि.4) राज्य निवडणूक प्राधिकरणाने खंडपिठासमोर शपथपत्र दाखल केले. निवडणूकीची प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबली होती, त्या टप्प्यापासून 6 मे पासून पुढील प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाईल असे शपथपत्रात नमूद केल्याने खंडपिठाने आवारे यांची याचिका निकालात काढली आहे. त्यामूळे ‘स्टाईस’ च्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला असून आवारे यांनी पुढाकार घेत पावले उचलल्यामूळे त्यांचे उद्योग क्षेत्रात स्वागत होत आहे.

शेवटी सत्याचा विजय

करोनाचे खोटे कारण दाखवून निवडणूक प्रक्रिया लांबवणार्‍या प्रशासकीय मंडळाने संस्थेच्या 412 सभासदांचा विश्वासघात केला आहे. निवडून येण्याची खात्री नसल्यानेच राजकीय दबाव आणून प्रशासक मंडळाचा कार्यकाळ लांबवला जात होता. मात्र, उच्च न्यायालयात हे प्रकरण नेल्याने प्रशासक मंडळाला चपराक बसली व निवडणूक प्राधिकरणाला शपथपत्र दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. शेवटी सत्याचाच विजय होतो हे खरे आहे. संस्थेच्या सभासदांना न्याय मिळवून देण्याचे काम यापुढेही असेच सुरुच राहील.

नामकर्ण आवारे, माजी संचालक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com