मालेगाव । Malegaon (प्रतिनिधी)

देशासह राज्यात करोनापाठोपाठ बर्ड फ्लूने जनतेची चिंता वाढवली असली तरी पोल्ट्री तसेच स्टार्च कंपन्यांतर्फे सातत्याने मागणी होत असल्यामुळे मक्याचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. दररोज 5 ते 6 हजार क्विंटल आवक होत असली तरी चांगल्या प्रतीच्या मक्यास आज 1 हजार 475 रुपये इतका सर्वोच्च भाव मिळाला तर हलक्या प्रतीच्या मक्यास 1300 तर 1200 रुपये भाव मिळाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

मालेगावसह परिसरातील तालुक्यातील मक्यास महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश राज्यातील कंपन्यांतर्फे मागणी होत आहे. विशेष म्हणजे मलेशिया व तैवान देशातदेखील मका निर्यात होत आहे. बर्ड फ्लूचे सावट असले तरी मागणीत दररोज वाढ होत आहे. सदरची मागणी कायम राहिल्यास मक्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भिका कोतकर यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मक्याची आवक वाढली आहे. आज सुमारे तीनशे वाहनांतून पाच ते सहा हजार क्विंटल मका तालुक्यासह परिसरातील शेतकर्यांनी विक्रीसाठी सकाळपासूनच आणला होता. बाजार आवारात वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने कॉलेज मैदानावर शेतकर्यांनी आपली वाहने उभी केली होती.

मोठ्या प्रमाणात आवक झाली असतानादेखील चांगल्या प्रतीच्या मक्यास 1475 व कमीत कमी 1400 रुपये भाव मिळाला. तर त्यापेक्षा थोड्या हलक्या प्रतीच्या व डागी मक्यास 1300 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला.

राज्यात बर्ड फ्लूचे आगमन झाल्याने पोल्ट्री व्यावसायिकांसह मका उत्पादक शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने पक्षी दगावले आहेत. मात्र इतर ठिकाणी अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे कोंबड्यांच्या विक्रीवर परिणाम झाल्याने त्याचा फटका मक्याचे भाव कोसळण्यात झाला होता. चांगल्या प्रतीचा मका 1100 ते 1200 रुपये या भावात विकण्याची वेळ शेतकर्यांवर आली होती.

मात्र अफवेचे मळभ दूर झाल्याने व पोल्ट्री खाद्य तसेच स्टार्च फॅक्टर्यांतर्फे पुन्हा मागणीत वाढ होऊ लागल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून मक्याचे भाव तेजीकडे सरकू लागले आहेत. बाजार समितीत दररोज पाच ते सहा हजार क्विंटल मक्याची आवक होत असतानादेखील उत्पादकांना चांगला भाव मिळत आहे. मागणीमुळे अफवेचा बाजारावर कुठलाही परिणाम होत नसल्याने मका उत्पादकांना चांगला दिलासा मिळाला आहे.

बाजार समितीत विक्री केलेल्या मक्याचे रोख पेमेंट शेतकर्यांना व्यापार्यांतर्फे अदा केले जात आहे. चांगला भाव मिळत असल्याने तालुक्यासह परिसरातील शेतकर्यांनी आपला मका विक्रीसाठी समितीत आणावा, असे आवाहन सचिव अशोक देसलेंसह व्यापार्यांतर्फे करण्यात आले आहे.

आगामी दिवसांत मक्यास चांगले भविष्य

मलेशिया व तैवान देशात होत असलेली निर्यात तसेच महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये पोल्ट्री व स्टार्च कंपन्यांतर्फे मक्यास मागणी वाढली आहे. बर्ड फ्लूचे सावट असले तरी त्याचा परिणाम मागणीवर झालेला नाही.

त्यामुळे चांगल्या प्रतीच्या मक्याचे भाव वाढले आहेत. हलकी प्रत व डागी मक्यासदेखील त्या मानाने चांगला भाव मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे मका भावाचा तेजीकडे कल आहे. आगामी काळात मागणी कायम राहिल्यास मक्यास विक्रमी भाव मिळू शकेल, अशी शक्यता व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भिका कोतकर यांनी व्यक्त केली.