कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्यावी

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्यावी

नाशिक । प्रतिनिधी

राज्यभरात करोना महामारीची परिस्थिती नियत्रंणात असून नाशिक जिल्ह्यातही परिस्थिती सुरळित होत आहे. ते बघता मागील नऊ महिन्यांपासून बंद असलेले खासगी कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन नाशिक (सीसीटीएफएन) यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली.

संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि.14) जिल्हाधिकारी मांढरे यांची भेट घेत त्यांना मागणीचे निवेदन देत चर्चा केली. करोना संकटामुळे लॉकडाउन लागू होता. या कालावधीत शहर व जिल्ह्यातील कोचिंग क्लासेसपण बंद होते. त्यानंतर सरकारने ममिशन बिगिन अगेनफ म्हणत लॉकडाउन टप्पा टप्प्याने उठवला. आता परिस्थिती नियंत्रणात आली असून जीवनमान पूर्वपदावर येत आहे.

व्यवसाय व उदयोगधंदे सुरु झाले आहेत. त्याच धर्तीवर कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी संघटनेकडून जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. सातारा, वर्धा, पुणे आदी शहरात तेथील जिल्हा प्रशासनाने कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती यावेळी पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांंना दिली. पहिली ते आठवी सोडून पुढील वर्गासाठी कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी कोचिंग क्लासेस सुरु करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दिली. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक प्रा.कारभारी म्हस्के, जिल्हाध्यक्ष प्रा.विजय डोशी, राज्य संघटक ज्ञानेश्वर म्हस्के, राज्य कार्यध्यक्ष प्रा.यशवंत बोरसे, जिल्हा सचिव प्रा.निलेश सुराणा आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मांढरे यांची भेट घेऊन त्यांना कोचिंग क्लासेस सुरु करावे या मागणीचे निवेदन दिले. जिल्हाधिकार्‍यांनी क्लासेस सुरु करण्याबाबत लवकरच परवानगी देऊ, अशी ग्वाही दिली.

प्रा.विजय डोशी, जिल्हाध्यक्ष, कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com