परिवहन आयुक्तांसह 10 अधिकार्‍यांचे जबाब

तक्रारदार पाटील आज पोलिसांसमोर हजर होणार
परिवहन आयुक्तांसह 10 अधिकार्‍यांचे जबाब
USER

नाशिक। प्रतिनिधी

राज्य परिवहन विभागातील (आरटीओ) भ्रष्टाचारप्रकरणी नाशिक पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत परिवहन आयुक्तांसह परिवहन विभागातील 10 अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान तक्रारदार पाटील आज सोमवारी नाशिक पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर होणार आहेत.

राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे शनिवारी नाशिक येथे चौकशीसाठी हजर होते. त्यांच्याआधी परिवहन विभागातील 9 अधिकार्यांची चौकशी करून पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी जबाब नोंदवले आहेत. उद्या यातील 4 अधिकारी हजर राहणार आहेत. तक्रारदार गजेंद्र पाटील यांनी सोमवारी आपण किंवा आपले वकील जबाबासाठी नाशिक पोलिसापुढे हजर राहतील, असे पत्र नाशिक पोलिसांना पाठवले आहे. आपण आजारी असून आपल्या जीवितास धोका असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक असणारे गजेंद्र तानाजी पाटील (रा. डोन दिघर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे तक्रारदार अधिकार्याचे नाव आहे. पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यास 15 मे रोजी ईमेलद्वारे दिलेल्या तक्रारीत तसेच 24 मे रोजी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत गंभीर आरोप केले आहेत.

राज्यातील परिवहन विभागात मलईदार विभागात बदली करण्यासाठी राज्यातील सर्व परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी संघटितपणे भ्रष्टाचार करीत आहेत. अधिकार्यांच्या बदल्या, पदोन्नती, जातीवाद, जमा केलेली संपत्ती, आरटीओ अधिकार्याचे अनाधिकृत मासिक उत्पन्न, बदल्यांमुळे मिळणारे पैसे सातत्याने पैशांची मागणी आणि त्यासाठी विशिष्ट समाजातील अधिकार्यांना निलंबित करणे आदी गंभीर आरोप पाटील यांनी केले आहे.

या आरोपांव्यतिरिक्त आरटीओतील अधिकारी संगनमत करून शासनाचा महसूल आपल्या खिशात कशा पद्धतीने घालतात, याचीही उदाहरणे दिली आहेत. विशेष म्हणजे नाशिकच्या परिवहन अधिकार्यासह वरिष्ठ अधिकारी, परिवहनमंत्री अनिल परब यांच्याही नावाचा उल्लेख पत्र व याचिकेत करण्यात आला आहे. यात परिवहन विभागाचे मंत्री, सचिव, उपसचिव, अपर सचिव, सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी संघटितपणे भ्रष्टाचार करीत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणा तसेच महाराष्ट्र पोलीस यंत्रणा कुचकामी असल्याने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी, असेही पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

पाच दिवसांत अहवाल

नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून या प्रकरणी चौकशी सुरू असून अधिकार्यांचे जाबाबद नोंदले जात आहेत. आतापर्यंत 10 अधिकारी हजर राहिले असून एकूण 14 जणांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. दरम्यान कोणत्याही स्थितीत 5 दिवसांत ही चौकशी पूर्ण करून नाशिक पोलीस शासनास अहवाल सादर करणार आहेत. यात तक्रारदार पाटील यांचा जबाब नोंदवणे अद्याप बाकी आहे. त्यानंतरच या प्रकरणातील वास्तव समोर येणार आहे.

अधिकार्‍यांची संख्या 12 वर

पाटील यांच्या तक्रारीनुसार परिवहन भ्रष्टाचार प्रकरणात उपपरिवहन आयुक्त जितेंद्र कदम, उपसचिव प्रकाश साबळे, अवर सचिव डी.एच. कदम, वर्धाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमटे, नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी भारत कळसकर, जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी लोही, धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे, धुळे व ठाणे येथील 2 वाहन निरिक्षक, धुळ्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे, जळगाव व धुळे येथील दोन खासगी व्यक्ती तसेच मंत्रालयातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com