निसाका-रासाका बाबत कृषीमंत्र्यांना साकडे
नाशिक

निसाका-रासाका बाबत कृषीमंत्र्यांना साकडे

Abhay Puntambekar

निफाड। प्रतिनिधी Niphad

निसाका-रासाका शासनदरबारी लवकर प्रयत्न करून कार्यान्वित करावा या मागणीचे निवेदन देऊन गोदाकाठ वासीयांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले. आढावा बैठकीसाठी निफाडमध्ये आलेल्या कृषीमंत्री दादा भुसे यांची निफाड सोसायटीच्या सभागृहात करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके यांच्या पुढाकाराने गोदाकाठच्या शिष्टमंडळाने माजी आमदार अनिल कदम व जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन चर्चा केली. यावेळी निसाकासाठी शासन दरबारी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन भुसे यांनी शिष्टमंडळाला दिले.

करंजगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपालिका सदस्य खंडू बोडके यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज रोजी निफाड तालुक्यात साडेपाच हजार हेक्टरपेक्षा अधिक ऊस उभा आहे. करोना प्रादुर्भावामुळे उन्हाळ्यात रसवंतीगृहे बंद असल्याने ऊसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात निफाडमध्ये ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्याही आत्महत्या होऊ शकतात. त्यामुळे निसाका-रासाका कार्यान्वित होणे ही काळाजी गरज आहे. त्यासाठी शासन दरबारी आपण सहकार्य करावे.

तालुक्याचे आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांचेही या मुद्यावर एकमत असल्याने व राज्यात महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही निसाका-रासाका सुरू करण्याचा शब्द दिलेला असल्याने आपण नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून पुढाकार घेऊन हे दोन्ही कारखाने चालू हंगामात सुरू करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली आहे. तसेच अधिक गाळप क्षमतेच्या निसाकाची मालमत्ता जप्त असल्याने शासनाने खास बाब म्हणून निसाकाच्या कर्जाची थकहमी कार्यान्वित करावा असे साकडे गोदाकाठ वासीयांच्या वतीने बोडके यांनी कृषी मंत्री भुसे यांना घातले आहे.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, अनिल कुंदे, संजय कुंदे, विक्रम रंधवे, ललित गिते आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. भुसे यांना दिलेल्या निवेदनावर कोठूरेचे सरपंच आशिष मोगल, पिंपळसचे सरपंच तानाजी पुरकर, संपत डुंबरे, दत्तू भुसारे, सागर जाधव, राजेंद्र राजोळे, रामदास गिते, बाळासाहेब कानडे, रतन डेर्ले आदींच्या सह्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com