नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या सुमारे साडे सात हजार कर्मचार्यांपैकी अडीच हजाराच्या आसपास कर्मचारी हे सेवानिवृत्त व मयत झाले आहे. आज केवळ 4900 कर्मचारी कार्यरत आहे. परिणामी उपलब्ध कर्मचार्यांवर जादा कामाचा अतिरिक्त कार्यभार येत असल्याने राज्य शासनाकडे प्रंलबीत असलेला कर्मचारी आकृतीबंध मंजुरीसाठी महापौर सतिश कुलकर्णी यांच्यासह पदाधिकार्यांनी नुकतीच पालकमंत्री छगन भुजबळ भेट घेतली. महापालिकेचा आकृतीबंध मंजुर करावा व कर्मचारी भरतीचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागवावा असे सांकडे पालकमंत्र्यांना घालण्यात आले.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची नुकतीच महापौैर, सभागृह नेते सतीश बापू सोनवणे, भाजपा गटनेते जगदीश पाटील यांनी भेट घेत नाशिक महापालिकतील प्रलंबीत प्रश्नासंदर्भात चर्चा केली. यासंदर्भातील एक निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले. नाशिक महानगरपालिकेत सद्यस्थितीत अपुर्या कर्मचारी संख्येमुळे अनेक विभागांच्या कामामध्ये अडथळा येत आहे. घरपट्टी पाणीपट्टी तसेच विविध कर विभाग या विभागातील कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त तसेच मयत झाल्याने या विभागातील उत्पन्न वसुलीचा जो भाग आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत असून ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी प्रमाणात महापालिकेला महसूल मिळत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

कर्मचार्यांवर जादा कामाचा अतिरिक्त कार्यभार येत असल्याने कर्मचार्यांमध्ये नाराजी आहे. तसेच नाशिक महानगरपालिकेने राज्य शासनाकडे कर्मचारी आकृतीबंध मंजुरीसाठी पाठवलेला असून त्यास बराच कालावधी लोटला असल्याने त्यास अद्याप पर्यंत मंजुरी न मिळाल्याने कर्मचारी भरती प्रक्रिया हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागू शकलेला नाही. तेव्हा हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी पदाधिकार्यांनी केली. येवळी कर्मचारी भरती बाबत तसेच आकृतीबंध मंजुरीबाबत लवकरच मुंबईमध्ये संबंधित नगरविकास मंत्र्यांशी चर्चा करून आकृतीबंध मंजुरीस तसेच कर्मचारी भरती प्रक्रियेस तातडीने चालना देणे बाबत लवकरच चर्चा करण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या आश्वासनामुळे आकृतीबंध मंजुरी व नोकर भरती चा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे महापौर सांगितले.

तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे भुमिगत दोन मजली वाहन पार्किंग बाबत स्मार्ट सिटी अंतर्गत 121 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. त्याबाबत माननीय पालकमंत्री भुजबळ यांच्या समवेत चर्चा करण्यात आली असून नाशिक शहराच्या दृष्टिकोनातून वाहन पार्किंगचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. शहराच्या हिताचा महत्त्वाचा प्रश्न तसेच मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठेत सुमारे आठशे चार चाकी वाहने पार्किंग होणार असल्याने तोही आपण मार्गी लावावा असे महापौर यांनी पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नाशिक महानगरपालिका यांची एकत्रित बैठक घेऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले.