भाजपतर्फे आंदोलनाचा इशारा

कृषी विधेयकास स्थगिती शेतकरी विरोधी
भाजपतर्फे आंदोलनाचा इशारा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शेतकर्‍यांच्या जीवनात आमुलाग्र क्रांती घडविणारे कृषी विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने मंजूर केले.

मात्र सदर विधेयकास स्थगिती देण्याचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचे निषेधार्थ तालुका भाजपतर्फे आंदोलन छेडण्यात आले.

शेतकर्‍यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कृषिविषयक विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय त्वरीत मागे न घेतल्यास बाजार समितींसह तालुक्यातील गावागावांमध्ये आघाडी सरकारच्या स्थगिती निर्णयाची होळी केली जाईल, असा इशारा यावेळी भाजपा पदाधिकार्‍यांतर्फे देण्यात येवून तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.

केंद्र सरकारने केलेल्या कृषिविषयक विधेयकामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त व दलालांच्या जोखडातून मुक्त होणार आहे. कष्टाने पिकविलेल्या शेतमालाची विक्री व बाजारपेठेचे स्वातंत्र्य देखील त्यास मिळणार आहे. आपला शेतमाल देशात कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय शेतकर्‍यांच्या आर्थिक प्रगतीचा ठरणार आहे.

मात्र शेतकर्‍यांबद्दल वर्षनुवर्षे बेगडी प्रेम दाखविणार्‍या महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या या कृषी विधेयकास फक्त राजकारणासाठी विरोध करणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजार समिती निवडणुकीत शेतकर्‍यांना मतांचा अधिकार दिला होता. मात्र तो अधिकार देखील महाआघाडीच्या नेत्यांनी काढून टाकला आहे.

यावरूनच काँग्रेस आघाडीचे शेतकर्‍यांवरील प्रेम दिसून येत असल्याची टिका यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पंकज शेवाळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य जितेंद्रसिंग गिल, दादा जाधव, दीपक पवार, पं.स. सदस्य अरूण पाटील, तालुकाध्यक्ष दीपक देसले, सुनिल बच्छाव, शक्ती सरोदे, राजेंद्र पाटील, अतुल वाघ आदी नेत्यांनी यावेळी बोलतांना केली. मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com