ब्रास बॅण्ड संघटनेतर्फे निवेदन

ब्रास बॅण्ड संघटनेतर्फे निवेदन

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, मंगलकार्य, विवाहकार्य यावर निर्बंध आल्यामुळे बॅण्डचा व्यवसाय अडचणीत आला आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून विवाह तर काही प्रमाणात सुरु झाले परंतू या विवाहात बॅण्डचा मंगल सूर अजून मंगल कार्यालयात घुमला नाही. विवाह कार्यातील हा सूर पुन्हा एकदा सुरू करावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नाशिक जिल्हा ब्रास बॅण्ड असोशिएशनच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील खूप मोठा कलाकार वर्ग हा बॅण्ड व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतो आणि बॅण्ड ला परवानगी नसल्याने या सर्व कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बॅण्ड मालकांची व कलाकाराची उपासमार टाळण्यासाठी तातडीने राज्यातील बॅण्ड व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी सर्व बॅण्ड मालकांनी उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली.

यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनाही निवेदन देण्यात आले. या दोन्हीही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी ब्रास बॅण्ड संघटनेचे अध्यक्ष शेख मास्टर, सचिन आहेर, सुकदेव मोटमल, तुकाराम धुमाळ, नजीर पठाण, योगेश शिंदे, हिरा शेख, विलास चव्हाण, शिवाजी कोरडे आदी बॅण्ड मालक मुंबई येथे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com