नाशिक | Nashik
एसटी महामंडळाच्या महत्त्वाच्या सेवा प्रकल्पातील शिवशाही वातानुकूलित शयनयान सेवा बंद झाली आहे. भाडेतत्त्वावरील असलेल्या या सेवेतून काही कंपन्यांनी घेतलेली माघार, प्रवाशांचाही अल्प प्रतिसादासह अन्य कारणे बंद होण्यास कारणीभूत ठरली आहेत.

सध्या सुरू असलेल्या एसटीच्या विना वातानुकूलित शयनयान सेवेला मात्र चांगला प्रतिसाद आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये भाडेतत्त्वावरील शिवशाही शयनयान वातानुकूलित बससेवेत आली आणि पहिली बस शिरपूर (धुळे) ते पुणे मार्गावर धावली. त्यानंतर या सेवेचा विस्तार केला गेला.

एसटीने या बस गाडय़ांसाठी मुंबई ते कोल्हापूर, जळगाव, परळी, अक्कलकोट, आंबेजोगाई, पुणे ते नांदेड, लातूर ते कोल्हापूर, औरंगाबाद ते मुंबई सेंट्रल यासह अन्य मार्ग निवडले. मात्र एक हजार रुपयांपेक्षा जास्त भाडे त्यातुलनेत खासगी सेवांचे कमी दर यातून एसटीच्या सेवेला कमी प्रतिसाद मिळू लागला.

त्यामुळे फे ब्रुवारी २०१९ मध्ये शिवशाही वातानुकू लित शयनयानचे विविध मार्गावरील प्रवास भाडे २३० ते ५०५ रुपयांनी कमी केले. तरीही या सेवेचे सरासरी प्रवासी भारमान ३५ ते ४० टक्के पर्यंतच राहिले. एसटी महामंडळाच्या अटी, शर्ती, भाडेतत्त्वावर देणाऱ्या कंपन्यांनाही होणारे नुकसान पाहता यातील काही कंपन्यांनी सेवेतून माघार घेतली.

त्यामुळे एकूण ६८ पैकी ३० वातानुकूलित शयनयान बसगाडय़ाच ताफ्यात राहिल्या. मार्च २०२० मध्ये टाळेबंदीत ही सेवा पूर्णपणे बंद झाली आता एसटीच्या ताफ्यात एकही वातानुकूलित शयनयान बस नाही.

मोठय़ा प्रमाणात धावणाऱ्या खासगी बसमुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडते. या प्रवाशांना पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी महामंडळाने शिवशाही शयनयान वातानुकूलित बस दाखल करण्याचा निर्णय घेतला.