मांजरपाडा-2 चे काम तात्काळ सुरू करा

राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा संघर्ष समितीचा टोला
मांजरपाडा-2 चे काम तात्काळ सुरू करा
USER

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

नार-पार खोर्‍यातील 50 टीएमसी पाणी अती त्रुटीच्या गिरणा खोर्‍यात वळविणे आवश्यक असताना अवघे 10 टीएमसी पाणी जर दिले जात असेल तर तो अन्यायकारक व गिरणा खोर्‍याला सापत्न वागणूक देणारा ठरणार आहे. डॉ. माधवराव चितळे समितीच्या अहवालानुसार गिरणा खोर्‍यात 50 टीएमसी पाणी उपलब्ध करून देत नार-पार गिरणा प्रकल्पात वांजुळपाणी प्रवाही वळण योजनेचा समावेश करावा, मांजरपाडा 2 ( Manjarpada-2 )चे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी वांजुळपाणी संघर्ष समितीतर्फे ( Wanjulpani Sangharsh Samiti ) करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या वतीने नार-पार खोर्‍यातील पाणी पूर्व भागात वळविण्याचा नदीजोड प्रकल्पास तत्वतः मान्यता दिल्याची चर्चा आहे. त्यात नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाचा समावेश असून त्यातून 10 टीएमसी पाणी गिरणा खोर्‍यात वळविले जाणार आहे.

डॉ. माधवराव चितळे समितीच्या अहवालानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियुक्त विविध समित्यांच्या माध्यमातून नार-पार खोर्‍यातील पाणी महाराष्ट्रातील त्रुटीच्या खोर्‍यात वळविण्याच्या प्रकल्पांना मान्यता देण्याबाबत स्पष्ट अहवाल दिलेले असतांना शासन फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी वेळोवेळी काहीतरी नवीन घोषणा करते व जनता शासनाच्या भूलथापांना बळी पडते त्यामुळे जोपर्यंत निधीची तरतूद होत नाही तोपर्यंत हे नदीजोड प्रकल्प स्वप्न असल्याची टिका संघर्ष समितीने केली आहे.

राज्य सरकार जर स्वतःच्यां निधीतून हा प्रकल्प उभारणार असेल व गुजरातकडे वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवण्याची वल्गना व वेळोवेळी आश्वासन दिले असताना 46 टीएमसी पाणी कोणाला देणार हा मूळ मुद्दा आहे. तापी व गिरणा खोरे त्रुटीचे खोरे आहेत. गिरणा खोर्‍यात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नार-पार हा अंतिम पर्याय आहे.

असे असतांना देखील अती त्रुटीच्या खोर्‍यावर पुन्हा अन्याय केला जात आहे. सत्तेच्या जोरावर ना. छगन भुजबळ यांनी मांजरपाडा प्रकल्प गोदावरी खोर्‍यात वळविला आता त्या प्रकल्पाच्या माध्यमातून गिरणा खोर्‍याच्या हक्काच्या पार नदीतील पाण्यावर हक्क दाखवला जात आहे हे पाणीटंचाईने त्रस्त गिरणा खोर्‍यावर अन्याय करणारे ठरणार आहे.

नार-पार योजनेत वांजुळपाणी वळण योजनेचा समावेश करत मांजरपाडा प्रकल्प 2 चे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी संघर्ष समितीचे प्रा. के.एन. आहिरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विश्वासराव देवरे, शेखर पवार, निखिल पवार, देवा पाटील, कुंदन चव्हाण, प्रभाकर शेवाळे, दत्तू खैरनार, शेखर पगार, मनीष सूर्यवंशी, शरद पाटील, सुशांत कुलकर्णी, अनिल निकम, अरूण पाटील, दीपक पाटील, कपिल डांगचे, यशवंत खैरनार आदींनी पत्रकाव्दारे केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com