मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

थकबाकीच्या कारणावरून गिरणा धरणातून नांदगावसह 56 गाव योजनेचा पाणीपुरवठा जिल्हा परिषदेने खंडित केल्याने या गावांमध्ये ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. विहिर-तलावातील दुषित पाण्याचा पिण्यासाठी वापर होत असल्याने ग्रामस्थांना विविध आजार बळावत आहे. करवसुली न होण्यास ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे.

मात्र कर भरणार्या ग्रामस्थांना देखील पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. शासनाने याची गंभीरतेने दखल घेत 56 गाव योजनेचा पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा, अन्यथा हजारो ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जि.प. माजी अध्यक्ष मधुकर हिरे यांनी दिला आहे.

जिल्हा परिषदेने गिरणा धरण 56 गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा 11 जानेवारीपासून पाणीपट्टी थकल्यामुळे बंद केला आहे. यामुळे निमगावसह मालेगाव तालुक्यातील 39 तर नांदगाव तालुक्यातील 18 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. गोरगरीब ग्रामस्थ विहिर व तलावातील पाणी पिण्यास वापरत असल्याने विविध आजारांनी बाधीत होत आहे. त्यामुळे दुषित पाण्यामुळे अप्रिय घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ब्रिटिश अर्थसहाय्यातून 1998 मध्ये साकारण्यात आलेल्या 56 गाव पाणीपुरवठा योजनेमुळे नांदगाव शहरासह 18 गावे तर मालेगाव तालुक्यातील 39 गावांमध्ये पाणीपुरवठा होत आहे. अनेक अडचणींवर मात करत ही योजना सुरू आहे. पाणीपट्टी वसुली होण्यासाठी बीडीओ दर्जाच्या अधिकार्याची देखील नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे पाणीपट्टी थकबाकी वाढल्याचा आरोप हिरे यांनी केला आहे.

पाणीपट्टी थकीत असल्यामुळे हा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र सदर वसुली करण्याची ज्यांची जबाबदारी होती त्या ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासन अधिकार्यांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी कारवाई कां केली नाही? वसुली करणे शासनाची जबाबदारी असताना कर भरणार्या ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी अशा स्वरूपाचा आहे. 11 दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिला, आबालवृध्दांची पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरू आहे.

जार व बॉटलव्दारे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. आर्थिक विवंचनेअभावी गोरगरीब ग्रामस्थ विहीर व तलावाच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करत आहेत. मात्र या पाण्यामुळे रोगराई पसरू लागल्याने जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे 56 गाव योजनेचा पाणीपुरवठा तत्काळ सुरू करावा, अन्यथा रास्तारोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा हिरे यांनी निवेदनाच्या शेवटी दिला आहे. क

अधिकार्यांचा हलगर्जीपणा; मंत्र्यांनी लक्ष घालावे

जिल्हा परिषदेने थकबाकीचे कारण दाखवत गिरणा धरणातून 56 गावांचा पाणीपुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. वसुलीत अधिकार्यांच्या झालेल्या हलगर्जीपणाचा फटका कर भरणार्या नागरिकांना देखील बसत आहे. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने विहीर, तलावातील दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे याप्रश्नी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे व नांदगावचे आ. सुहास कांदे यांना लक्ष घालून तोडगा काढत त्वरित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी अपेक्षा मधुकर हिरे यांनी व्यक्त केली आहे.