
नाशिक । प्रतिनिधी Nashik
स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ यांच्यातर्फे आणि ऋणमुक्त फाऊंडेशनच्या सहकार्याने सुरगाणा येथील चिंचपाडा, चिर्याचा पाडा आणि खोकरविहीर येथे ‘मिशन 2023 हर घर जल’ची सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत 100 ड्रमसाठी लोकसहभागातून देणगी गोळा करण्यात आली. अनेक व्यक्ती आणि संस्थांनी यासाठी देणगी दिली. तसेच हा इतका मोठा उपक्रम देणगी देणार्यांशिवाय केवळ अशक्य होता. त्यांनी ठेवलेल्या विश्वासाबद्दल स्त्री उद्यमी फाऊंडेशनच्या अध्यक्ष दीपाली चांडक यांनी आभार मानले. या उपक्रमाअंतर्गत 100 परिवारातील महिलांची अडचण दूर करत महिलांना रोलिंग ड्रम देण्यात आले.
ऋणमुक्त फाऊंडेशनच्या रुपल गुजराथी यांनी मनोगत व्यक्त करताना जलपरिषद फाऊंडेशनच्या देवीदास कामाडी, दुर्वादास गायकवाड आणि संपूर्ण टीमच्या विशेष सहकार्याबद्दल आभार मानले. राधिका पवार यांनी या पाड्यातील महिला उद्योजकता विकासासाठी स्वयंशक्ती नक्कीच विविध उपक्रम राबवेल, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी प्रज्ञा अडांगळे, पवन पवार, संदीप शिंदे, संदेश मेहंदळे, गीता देसाई, शीला गुजराथी, राजेंद्र धारणकर, अमीर मिर्झा, प्रशांत सारडा, नरेंद्र पाटील, भावेश पटेल, निखिलेश काळे आदी उपस्थित होते.