बैलगाडा शर्यत सुरु करण्याबाबत झिरवाळांना साकडे

बैलगाडा शर्यत सुरु करण्याबाबत झिरवाळांना साकडे

जानोरी | वार्ताहर | Janori

बैलगाडा शर्यती (Bullock cart race) सुरु करण्याबरोबरच संबंधित खटल्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बैलगाडा संघटनेच्या प्रतिनिधींसोबत मंत्र्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्याची मागणी निवेदनाद्वारे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Jirwal) यांच्याकडे अखिल भारतीय बैलगाडा शर्यत शौकीनांकडून करण्यात आली....

बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला (Maharashtra) सुमारे चारशे वर्षापूर्वीची परंपरा आहे. पारंपरिक वारसा, आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते.

बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळेदेखील गाय-बैलाचे संगोपन चांगल्या प्रकारे केले जाते. बैलांचे संगोपन शेतकरी (Farmers) स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने करत असतो.

बैलांच्या संगोपनाबाबत शासनस्तरावर आजपर्यंत कोणतीही योजना प्रस्तावित नाही. बैलांच्या प्रदर्शन बंदीमुळे बैलांच्या जाती नामशेष होण्याची भीती आहे. शर्यत बंदीमुळे देशी बैलाचे उपयुक्तता मूल्य धोक्यात आल्यामुळे जतन संवर्धनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

तसेच शर्यत बंदीमुळे शेतकऱ्यांची गाय-बैल संगोपनाची प्रेरणाच नष्ट होत आहे. ग्रामीण भागात देवदेवतांच्या यात्रेमध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यती आयोजित करण्याची मोठी परंपरा आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होते.

महाराष्ट्राने शासनाने यानुसार हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केले. (SUP 3526/2018) सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाची ही स्वतंत्र याचिका विस्तारित खंडपीठाकडे म्हणजेच पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केली आहे.

महाराष्ट्र शासनाने बैलांच्या धावण्याच्या क्षमतेबाबत समिती नेमून त्या समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. सर्वोच्च न्यायालयात मागील तीन वर्षात कोणत्याही प्रकारची सुनावणी झाली नाही म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे.

तरी ना. झिरवाळ यांनी बैलगाडाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा करून या विषयांमध्ये लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी तत्काळ घेतली जावी.

तसेच यासंबंधी चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय बैलगाडा शर्यत शौकीनांकडून केली असता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी लवकरच मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

बैलगाडा शर्यत शौकीनांकडून करण्यात येणारी मागणी रास्त असून त्याबाबत त्यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. लवकरच मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून योग्य तो तोडगा काढण्यासाठी आपण आवश्यक प्रयत्न करू.

- नरहरी झिरवाळ, विधानसभा उपाध्यक्ष.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com