ग्रामीण भागासाठी बस सुरू करा

बस सेवा
बस सेवा

नांदूरशिंगोटे । Nandurshingote (वार्ताहर)

लॉकडाऊननंतर प्रथमच काही दिवसांपूर्वी नववी ते बारावीपर्यंत आणि 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्या. यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थी व शिक्षकांची ये-जा वाढली. त्यामुळे आता बस सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नांदूरशिंगोटे तसेच परिसरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व नोकरदार तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करतात, तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी संगमनेर, लोणी, सिन्नर व दोडी येथे विद्यार्थी जातात. लॉकडाऊनमुळे बस फेर्‍या बंद केल्या होत्या, तर अनलॉकनंतर महत्त्वाच्या ठिकाणच्या कमी प्रमाणात बस फेर्‍या सुरू झाल्या, परंतु ग्रामीण भागात बस फेर्‍या सुरू झालेल्या नाहीत.

ग्रामीण भागातील बस फेर्‍या बंद होत्या, तरी काही अडचण येत नव्हती, परंतु शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी येत आहेत. काही विद्यार्थी, विद्यार्थिनी शाळेत पायी जात आहेत, तर काही सायकलने. ग्रामीण भागातील बस फेर्‍या बंद असल्याने, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी येत आहेत.

विद्यार्थाची गैरसोय टाळण्यासाठी सिन्नर व संगमनेर आगारातून ग्रामीण भागात सुटणार्‍या बस फेर्‍या पूर्ववत सुरू करण्याची मागणी पंचायत समितीच्या सभापती शोभा दीपक बर्के यांनी यांच्यासह विद्यार्थी, पालक करीत आहेत.

नाशिक-पुणे महामार्गावरील, तसेच सिन्नर व संगमनेर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण म्हणून नांदूरशिंगोटे गावाची ओळख आहे. येथील बस स्थानकात दररोज शेकडो बसेस ये-जा करत आहेत, परंतु कोरोना काळात सिन्नर आगारातील काही बसेस बंद होत्या.

अलीकडच्या काळात काही बसेस सुरू झाल्या आहेत, परंतु मुक्कामी बसेस अद्यापही सुरू न झाल्याने ग्रामीण भागात प्रवाशांची अडचण होत आहे. ग्रामीण भागातील बसेस पूर्ववत सुरू झाल्यास परिवहन विभागाच्या उत्पन्नात वाढ होईल. सिन्नर ते संगमनेर बस सुरू झाल्यास नांदूरशिंगोटे व दोडी परिसरातील प्रवाशांची अडचण दूर होणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com