‘स्टाईस’च्या प्रशासकीय मंडळास मुदतवाढ

‘स्टाईस’च्या प्रशासकीय मंडळास मुदतवाढ

सिन्नर। प्रतिनिधी | Sinnar

सिन्नर तालुका (sinnar taluka) सहकारी औद्योगिक वसाहतीच्या (Cooperative Industrial Estates) अशासकीय प्रशासकीय मंडळास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे

पत्र सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव सु. लो. अंबिलपुरे यांच्या सहीने राज्याच्या सहकार आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. चार-पाच दिवसात वसाहतीच्या निवडणुकीचा (election) कार्यक्रम घोषित होण्याची अपेक्षा असताना अचानक आलेल्या या पत्रामुळे व पत्रातील भाषेमुळे उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.

जिल्हा उपनिबंधकांच्या (District Deputy Registrar) माध्यमातून 27 जानेवारी 2022 रोजी अशासकीय प्रशासकीय मंडळास (Non-Governmental Administrative Board) मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला (state government) पाठवण्यात आला असल्याचा संदर्भ या पत्रात देण्यात आला आहे. राज्याच्या सहकार आयुक्तांनीही 8 फेब्रुवारी 2022 रोजी पत्र पाठवून मुदतवाढीचा प्रस्ताव दिला असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

या दोन्ही पत्राच्या अनुषंगाने सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या (Sinnar Taluka Industrial Estate) अशासकीय प्रशासक मंडळास सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्यास शासनाची मान्यता देण्यात येत असल्याचे राज्याच्या सहकार आयुक्तांना कळविण्याचे निर्देश आपल्याला देण्यात आले असून त्यानुसार आपण हे पत्र पाठवत आहोत व या पत्रानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी व अनुपालन अहवाल शासनास सादर करावा अशी विनंती उपसचिवांनी राज्याच्या सहकार आयुक्तांना केली आहे.

प्रशासक मंडळास मुदतवाढ देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे कळवल्याचे निर्देश आपल्याला दिले असल्याचे सांगणारे उपसचिव पत्राच्या शेवटी या पत्राप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी म्हणून राज्याच्या सहकार आयुक्तांना पत्रात विनंती करत असल्याने ही मुदतवाढ व त्याबाबतचे पत्र चर्चेचा विषय ठरले आहे. पत्राची प्रत जिल्हा उपनिबंधकांनाही आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.

विशेष म्हणजे वसाहतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (election) मतदार यादी (voter list) 7 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द झाली असून येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत मतदार यादीवर हरकती घेता येणार आहेत तर दोन मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा रीतसर कार्यक्रम जाहीर होणार असताना प्रशासक मंडळास मुदतवाढ देऊन निवडणूक लांबवण्याचा तर हा डाव नाही ना असाही प्रश्न उद्योगक्षेत्रात चर्चिला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com