एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार पावणेदाेन महिन्यांचे वेतन

महामंडळाने काढले परिपत्रक
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार पावणेदाेन महिन्यांचे वेतन

नाशिक |प्रतिनिधी Nashik

एसटी महामंडळातील लाखभर कर्मचाऱ्यांच्या लटकलेल्या पगाराचा तिढा अखेर सुटला असून कर्मचाऱ्यांना पावणेदाेन महिन्यांचे म्हणजेच २२५ टक्के वेतन दिले जाणार आहे. परिवहन महामंडळाच्या लेखा खात्याने याबाबतचे परिपत्रक नुकतेच काढले असून साेमवार किंवा मंगळवारपर्यंत सर्वच विभागाचे पगार हाेणार आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांचे भारतीय स्टेट बँकेत खाते आहे अशा कर्मचा-यांचे वेतन सीएमपी प्रणालीव्दारे त्यांच्या खात्यात जमा होतील, तर ज्या विभागाची वेतनाबाबत पूर्ण तयारी नसल्यास अथवा त्यांच्याकडे तांत्रिक अडचणी असल्यास अशा विभागाचे दि. रविवार किंवा सोमवारपर्यंत पगार होणार आहेत. तसेच स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेत पगार खाते असतील अशा कर्मचा-यांचे वेतन सोमवारी होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आर्थिक मदत व एस.टी कर्मचा-याचे वेतन यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्री अनिल परब व परिवहन राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या समवेत दि. ४ ऑगस्ट, २०२० रोजी मंत्रालयात बैठकीत झाली हाेती.

या बैठकीत वेतनाकरीता ५५० कोटी रूपयांचा निधी सवलत मुल्यांचा प्रतिपूर्तीपोटी अग्रीम म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. रकमेतून एसटी कर्मचा-यांचे माहे मार्च महिन्याचे २५%, मे महिन्याचे ५०% व जून महिन्याचे संपूर्ण वेतन देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.

महाराष्ट्र शासनाने एस.टी. कर्मचा-यांच्या वेतनाकरीता ५५० कोटी रूपये मंजुर केले असतांना या रकमेतून कर्मचा-यांच्या वेतनाशीवाय इतरत्र खर्च करण्यात येऊ नये अशी मागणी इंटकने केली होती. त्यानुसार एसटी प्रशासनाने माहे मार्च महिन्याचे उर्वरीत २५ टक्के वेतन तसेच मे महिन्याचे ५० टक्के वेतन यासह जून महिन्याचे १०० टक्के वेतन एस.टी. कर्मचा-यांना देण्यासंदर्भात आदेश पारित केले असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com