बस कर्मचारी
बस कर्मचारी |digi
नाशिक

४ हजार एसटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

सरळसेवा भरतीतील कर्मचारी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | प्रतिनिधी

एसटी महामंडळाने २०१९ मधील सरळसेवा भरती अंतर्गत रुजू करून घेतलेल्या चालक व वाहकांच्या नेमणुकांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका जवळपास ४ हजार कामगारांना बसणार असून एसटीने कराेना संकटातही कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

चार महिन्यांपासून लाॅकडाऊन व करोनामुळे एसटी महामंडळाच्या बसेसचे चाक थांबले आहे. त्यामुळे महामंडळाला राेज कोटयवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. आतापर्यंत राज्य शासनाच्या सवलतीच्या पैशातून कर्मचार्‍यांना वेतन दिले जात होते. मात्र राज्य शासनाकडून सवलतीचा पैसा येणे बंद झाल्यामुळे आता कामगारांना वेतन देणे एसटी महामंडळाला अवघड झाले आहे. त्यामुळे आर्थिक कारण सांगत एसटी महामंडळाने कर्मचार्‍यांना गेल्या महिन्यापासून ५० टक्के वेतन देण्यास सुरुवात केली आहे. तसेच आर्थिक बचत करण्याकरिता ते कर्मचार्‍यांना सक्तीच्या रजेवरही पाठवत आहेत.

२०१९ मधील सरळसेवा भरतीतील नेमणुकांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी घेऊन तसा आदेश संबंधित विभागांना दिला आहे. काढलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्यात येणार असताना भविष्यात आवश्यकता भासल्यास या कर्मचाऱ्यांना पुन्हा महामंडळात सामावून घेण्यात येईल, असेही नमूद करण्यात आलेले आहे. परत सेवेत घेताना सेवाज्येष्ठतचा निकष लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सरळ सेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक, सहाय्यक, लिपिक-टंकलेखक, राज्य संवर्ग पदांमध्ये व अनुकंपा तत्त्वावरील उमेदवार प्रशिक्षण घेत असल्यास त्या उमेदवाराचे प्रशिक्षण देखील दि. १७ जुलै २०२० पासून तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या या निर्णयास मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विरोध केला आहे.

केंद्रशासन व महाराष्ट्र शासनाने लाॅकडाऊनच्या कालावधीत कोणत्याही कामगारांना सेवेतून कमी करू नये व अशा कामगारांना लाॅकडाऊन कालावधीचे वेतन देण्यात यावे असे आदेश दिलेले आहेत. असे असताना परिवहन महामंडळाने कामगारांची सेवा खंडीत करणे म्हणजे शासन निर्णयाच्या विरूद्ध कार्य करण्यासारखे आहे, असे मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने म्हटले आहे. सन २०१९ ची नोकरभरती ही दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील उमेदवारांना त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह व्हावा या उद्देशाने जाहीरात देऊन केलेली आहे.

कामगारांची सेवा खंडित केल्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील अशा कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्याच प्रमाणे अनुकंपा तत्त्वावरील सहाय्यक, लिपिक-टंकलेखक व राज्य संवर्ग पदांमध्ये नेमणूक देण्यासाठी सध्या अशा उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यासही स्थगिती दिल्याने अशा उमेदवारांनाही नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे. सेवा स्थगिती करण्याबाबतचे दिलेले आदेश रद्द करावे अशी मागणी मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरीनहनुमंत ताटे यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com