नाशिक । प्रतिनिधी

डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळालाही मोठा फटका बसत असून, दररोज सरासरी एक कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती पुढे येत आहे. इंधन दरवाढीमुळे आर्थिक फटका बसत असल्याने नुकतीच मालवाहतुकीच्या दरातही वाढ करण्यात आली होती.

इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. एसटी महामंडळही यातून सुटले नाही. जानेवारी 2020 मध्ये 18 हजार एसटी गाड़या धावत असल्याने महामंडळाला प्रतिदिन 12 लाख लिटर डिझेल लागत होते. त्या वेळी डिझेलचा दर प्रति लिटर 66 रुपये इतका होता. जानेवारी 2021 मध्ये एसटीला प्रतिदिन 9 लाख लिटर डिझेल लागत आहे. मात्र डिझेलचा दर प्रति लिटर 77 रुपये इतका झाला आहे.

दुसरीकडे प्रवासी संख्या कमी असल्याने केवळ 14 हजार एसटी गाड़या धावत आहेत. त्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत यंदा दररोज सरासरी एक कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. या दरवाढीमुळे जानेवारी महिन्यात एसटीला सुमारे 30 कोटी रुपयांचा अतिरिक्त तोटा सहन करावा लागला आहे. प्रवासी संख्या कमी झाल्याने महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून कमी उत्पन्न मिळत आहे.

टाळेबंदीआधी दैनंदिन 65 लाख प्रवासी संख्या होती. त्यातून दररोज 21 ते 22 कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. आता 27 लाख प्रवासी संख्या झाली असून 15 ते 16 कोटी रुपये उत्पन्न मिळू लागले आहे. त्यातच इंधन दरवाढीची भर पडत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच महामंडळाने मालवाहतुकीच्या प्रति किलोमीटर दरात चार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला नवीन दरवाढ लागू केली आहे.