गावाकडं लालपरी कधी येणार..?

बस स्थानक
बस स्थानक

निफाड । Niphad

एकीकडे शहरी भागात बससेवा सुरू झाली असली तरी ग्रामीण भागात लालपरीची प्रतिक्षा आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन शासनाने मार्चपासून बससेवा बंद केल्याने ग्रामिण भागातील नागरिकांना दवाखाना, शासकीय कामकाज, बाजार, शेतमाल विक्री आदींसह विविध कामांसाठी नानाविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने शासनाने ग्रामिण भागात बससेवा सुरू करुन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शहरासह ग्रामिण भागातील आठवडे बाजार, खासगी प्रवासी वाहतूकीबरोबरच बससेवा बंद केली. त्याला आता सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला असून आता बससेवेअभावी नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खासगी प्रवासी वाहतूक देखील बंद असून ग्रामिण भागातील नागरिकांना दवाखाने, शासकीय दाखले, भाजीपाला व शेतमाल विक्रीसाठी तालुक्याच्या बाजारपेठेत ये-जा करावी लागते. मात्र प्रवासी साधने बंद असल्याने वरील कामे करण्यासाठी अडचणी येत आहे. बससेवेअभावी टपाल सेवा, वृत्तपत्रे, कुरिअर आदी सेवांचे नियोजन कोलमडून पडले आहे.

शासनाने शहरात जाणार्‍या प्रमुख मार्गावरील बसगाड्या चालू केल्या मात्र शेतकरी, शेतमजूर हे प्रामुख्याने ग्रामिण भागात वास्तव्य करीत असल्याने त्यांचेसाठी प्रवासाची कुठलीच साधने उपलब्ध नाहीत. एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला तालुक्याच्या ठिकाणी अथवा शहरी भागातील दवाखान्यात न्यावयाचे असल्यास कसे न्यावे याचे उत्तर मिळत नाही. गरिब जनतेचे प्रवासासाठी एस.टी हे प्रमुख साधन आहे.

त्यामुळे ग्रामिण भागातील नागरिकांचा विचार करता शासनाने खेडेगावात बससेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी होत असून खासगी प्रवासी वाहतूक देखील सुरू होणे गरजेचे बनले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com