लेखन कौशल्यासाठी विशेष मोहीम

शालेय शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरु
लेखन कौशल्यासाठी विशेष मोहीम
USER

नाशिक । प्रतिनिधी

करोनामुळे शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांची लेखन व वाचनाची गती मंदावली आहे. त्यामुळेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत विशेष मोहीम हाती घेण्यासंदर्भात विचार केला जात आहे. त्या-त्या वर्गात विद्यार्थ्यांचे अपेक्षित वाचन व लेखन कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स तयार करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.

वर्षभरापासून विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले जात आहे. परंतु, ऑनलाइन शिक्षणाला अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑफलाइन पद्धतीने विकसित होणारे लेखन कौशल्य आणि वाचन कौशल्य यावर चांगलाच परिणाम झाला आहे. विद्यार्थी वर्गामध्ये असताना शिक्षक त्याच्या वाचन व लेखनाकडे लक्ष देतात. त्यातून विद्यार्थ्यांचे हे दोन्ही कौशल्य विकसित होण्यास मदत होते. परंतु, शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक प्रगतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत सकारात्मक विचार करण्यास सुरुवात केली आहे.

आवश्यक उपाययोजना राबवणार

ऑनलाइन शिक्षणामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या लेखन व वाचन कौशल्यावर परिणाम झाला आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील. शिक्षण विभागातर्फे याबाबत विचार केला जात असल्याचे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रिज कोर्स तयार करणार

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन कौशल्ये विकासित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) ब्रिज कोर्स तयार करण्याचा विचार केला जात आहे, अशी माहिती एससीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com