पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष ‘अ‍ॅप’

पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष ‘अ‍ॅप’

नाशिक । फारूक पठाण

नाशिक महापालिकेची NMC पाणीपट्टीची Water Bill थकबाकी सुमारे शंभर कोटींपेक्षा जास्त झाली आहे. एवढी मोठी रक्कम अगदी कमी अधिकारी तसेच सेवकांमध्ये वसूल होणे अवघड होत असल्याने पाणीपट्टी वसुलीसाठी मनपा स्वतंत्र अ‍ॅप Special App for water bill recovery तयार करत असून दिवाळीनंतर हे अ‍ॅप नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

या अ‍ॅपद्वारे नागरिकांना आपल्या पाणी मीटरचे स्वत:च रीडिंग घेऊन बिलाची मोजणी करता येणार असून व्हॉटस्अ‍ॅप, इ-मेलद्वारे नागरिकांना बिल प्राप्त होणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. यासाठी तब्बल 2 लाख 18 हजार नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. घरगुती नळकनेक्शन धारकांना दर दोन महिन्यांनी तर व्यावसायिक नळ कनेक्शनधारकांना दर चार महिन्यांनी पाणीपट्टीची बिले दिली जाणे आवश्यक आहे. 259 चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या नाशिक महापालिकेत कर विभागात जेमतेम 98 कर्मचारी आहेत. या कर्मचार्‍यांकडे पाणीपट्टीसह घरपट्टी वसुलीची जबाबदारीही आहे.

अपुर्‍या कर्मचारी संख्येमुळे पाणीपट्टीची देयके वर्ष-वर्ष वाटप केली जात नाहीत. काही ग्राहकांना तर पाच ते सात वर्षे उलटली तरी पाणीपट्टीची देयके मिळू शकलेली नाहीत. देयके वेळेवर मिळत नसल्यामुळे एकाचवेळी दिल्या जाणार्‍या सरासरी बिलांमुळे वाढणारी पाणीपट्टीची रक्कम सर्वसामान्यांना भरणे परवडत नाही. त्यामुळे पाणीपट्टीची थकबाकी तब्बल 110 कोटींवर गेली आहे.

वार्षिक 70 ते 75 कोटी रुपये पाणीपट्टीतून मिळणे अपेक्षित असताना देयके वेळेत मिळत नसल्याने ही थकबाकी वाढत आहे. करोनामुळे नागरिक आधीच आर्थिक विवंचनेत असताना थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यासही करदात्यांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर पाणीपट्टी वसुलीसाठी डिजिटल मार्गाकडे महापालिकेने वाटचाल सुरू केली आहे. महावितरणच्या धर्तीवर पाणीपट्टी आकारणीसाठी आता मोबाईल अ‍ॅप तयार केले जाणार असून ते थेट नागरिकांनाच उपलब्ध करून दिले जाणार आहे.

अशी असेल रचना

नळकनेक्शनधारकांनी पाणी मीटरचा फोटो काढून अ‍ॅपवर अपलोड केल्यास त्याद्वारे तत्काळ पाणीपट्टीची मोजणी होऊन बिल मिळू शकणार आहे. त्याचबरोबर महापालिकेचे कर्मचारीदेखील या अ‍ॅपद्वारे बिलाची आकारणी करू शकतील. सदर अ‍ॅप जीपीएस लिंक असणार असल्याने मीटर रीडिंगमधील घोटाळा टळू शकेल. महापालिकेच्या कर्मचार्‍यांकडून अ‍ॅपद्वारे पाणीपट्टीची आकारणी केली जाईल.

त्याचबरोबर विशिष्ट कालमर्यादेत नागरिकांनादेखील याद्वारे पाणीपट्टीची आकारणी करता येईल. त्यासाठी अ‍ॅपवर पाणी मीटरच्या रीडिंगचा फोटो अपलोड करावा लागेल. संगणकीय प्रणालीद्वारे महापालिकेच्या पाणीपट्टी विभागाकडे त्याची नोंद होईल. यावर ग्राहक क्रमांक, जिओ टॅगिंग सोय असल्याने ग्राहकांनी दिलेल्या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर तसेच इ-मेलद्वारे ग्राहकांकडे पाणीपट्टीचे बिल पोहोचवले जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com