विद्यार्थ्यांची हुशारी पाहून पोलीस अधिक्षकही झाले अवाक्; सचिन पाटील यांची फांगदर शाळेला भेट

विद्यार्थ्यांची हुशारी पाहून पोलीस अधिक्षकही झाले अवाक्; सचिन पाटील यांची फांगदर शाळेला भेट

भऊर | वार्ताहर Bhaur

पोलीस अधिकारी (Police Officer) म्हटला की, चोवीस तास व्यस्त दिनचर्या. मात्र, आज पोलीस मुख्यालयापासून शंभर किमी अंतरावर असलेल्या द्विशिक्षकी शाळेला भेट देत नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Sachin patil, SP Nashik) यांनी अतिशय संवेदनशिलतेने मुलांशी गप्पा, गोष्टी केल्या...

पोलीस अधिकाऱ्यांतील संवेदनशील माणूस अनुभवत आपलेसे केलेले विद्यार्थ्यांकडे पाहत पालकांनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कोवळ्या वयात मुलांना पोलिसांचा धाक, पोलिसांबद्दल प्रचंड आकर्षण वाटतं.

या मुलांसमोर उभं राहून मुलांना बालगीत, बडबडगीत, कविता, ऱ्हाईम्स म्हणत मुलांना गोंजारत आनंदायी वातावरणात अध्यापन करत मुलाचे मन जिकून घेऊन या मुलांसोबत रममाण होतात.

असा आगळा वेगळा माहोल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फांगदर (खामखेडा) या देवळा तालुक्यातील शाळेत पहायला मिळाला.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी येथील उपक्रमशील शाळेला भेट देत त्या शाळेचे उपक्रम जाणून घेत मुलांना अध्यापन केले. यावेळी पहिलीतील नवीनच दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच दुसरीतील विद्यार्थ्यांना इंग्रजी अल्फाबेट, स्मार्टबोर्डच्या माध्यमातून मुळाक्षरे, बडबडगीत येरे-येरे पावसा, चांदोबा चांदोबा भागलास काय, मछली जल की राणी है, हे बडबडगीत स्वतः कृती करून म्हणून दाखवली.

तसेच विद्यार्थ्यांकडून कृती करून म्हणून घेतली. या वर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादी साहित्याच्या मदतीने एकक दशक, संख्या ओळख प्रत्यक्ष करून घेतली. इयत्ता तिसरी चौथीच्या वर्गात विद्यार्थ्यांना गुणाकार तसेच भागाकाराची गणिते स्वतः सोडवून दाखवली.

तिसरी चौथीच्या पाठ्यपुस्तकातील कविता,ऱ्हाईम्स विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतल्या. करोना काळात मुल अधिक मोबाईलशी जोडली गेली. याचे दुष्परिणाम व लहान मुलांनी घ्यावयाची काळजी याबद्दल देखील विध्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी देवळा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे (Deola Police Station Dilip Landge), गटशिक्षण अधिकारी सतिश बच्छाव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र शेवाळे, दीपक मोरे, धनराज शेवाळे, प्रकाश शेवाळे, साहेबराव मोरे, हेमंत मोरे, नंदू बच्छाव, भूषण आहेर, विजय मोरे, बबन सूर्यवंशी, अमित मोरे, दत्तात्रय बच्छाव, दीपक सूर्यवंशी, देविदास मोरे, सोपान सोनवणे उपस्थित होते. मुख्याध्यापक संजय गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. खंडू मोरे यांनी आभार मानले.

ग्रामीण भागातील अतिशय दुर्गम भागात द्विशिक्षकी शाळेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लोकसहभागातून साधलेला विकास व शिक्षकांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांचा साधलेला गुणवत्ता विकास या शाळेत पहायला मिळाला. खाजगी शाळांना देखील लाजवेल असा बदल दोघा शिक्षकांनी घडवून आणला आहे.

सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com