नाशकात लवकरच 'इतके' नवीन जलकुंभ

40 कोटी खर्च अपेक्षित; पाणीप्रश्न सुटणार
नाशकात लवकरच 'इतके' नवीन जलकुंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराचा पाणीप्रश्न ( Water Supply in Nashik City )कायमचा मार्गी लागण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. लवकरच नाशिक शहरात एकूण 26 नव्याने जलकुंभ ( Water Tanks )उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

यामुळे नागरिकांची कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यातून सुटका होणार आहे. नाशिक शहरातील विशेष करून जुन्या नाशिक भागात अनेक ठिकाणी नियमित पाणीपुरवठा होत नाही, तर कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी कायम आहेत. त्याच्यावर तोडगा म्हणून हा उपाय काढला आहे.

महापालिकेच्या नाशिक पूर्व विभाग, पश्चिम विभाग, सातपूर विभाग, पंचवटी विभाग, नाशिकरोड विभाग तसेच नवीन नाशिक या सहाही विभागांतील नागरिकांना पाण्याचा पुरवठा कमी होत असल्याने याप्रश्नी अनेकदा नागरिकांकडून, लोकप्रतिनिधी यांच्याकडून निवेदने देण्यात आली होती. तसेच महासभा, स्थायीच्या सभेत नव्याने जलकुंभ उभारण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती.

त्यानंतर पालिकेने शहरात 26 जलकुंभ बांधण्याचे काम हाती घेतले आहे. पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने विविध अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागतोय. काहीवेळा पाण्याची गरज भागवण्यासाठी पालिकेचा टँकर मागवण्याची वेळ येत असल्याचे दिसून येते. मात्र येत्या काही दिवसांत कमी दाबाच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे. शहरात पालिकेच्या सहाही विभागांत जलकुंभ उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच हे जलकुंभ पूर्ण होणार आहेत.

40 कोटींहून अधिक खर्च या जुलकुंभांसाठी लागणार आहे. नाशिकरोड विभागातील विहितगाव, देवळाली गाव, वडनेर दुमाला, शिवशक्तीनगर, चंपानगरी, देवळाली गावातील रमाबाई आंबेडकरनगर या सहा ठिकाणी प्रत्येकी वीस दशलक्ष लिटर जलकुंभ उभारण्याचे काम सुरू आहे. या परिसरातील नागरिकांना या जलकुंभामुळे मुबलक पाणी मिळ्णार आहे. महापालिकेच्या सहाही विभागांपैकी सर्वाधिक सात जलकुंभांचे काम पंचवटी विभागात सुरू आहे. त्यानंतर नाशिकरोड विभागात व नवीन नाशिक विभागात प्रत्येकी सहा याप्रमाणे जलकुंभ होत आहेत.

सातपूर तीन, पूर्व व पश्चिम प्रत्येकी दोन याप्रमाणे जलकुंभाचे काम सुरू आहे. पंचवटी विभागातील फिल्टर प्लांट येथील जलकुंभ 15 दक्षलक्ष व सातपूरमधील ओपन स्पेस्स येथे 10 दक्षलक्ष क्षमतेची टाकी होणार आहे. तर उर्वरित 24 जलकुंभ 20 दशलक्षाचे असणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com