लवकरच चोवीस तास वीजपुरवठा : विपलक पाल
नाशिक

लवकरच चोवीस तास वीजपुरवठा : विपलक पाल

Abhay Puntambekar

मालेगाव । प्रतिनिधी Maleaon

शहरातील वीज ग्राहकांच्या तक्रारी-समस्या लवकरात लवकरच मार्गी लावू. २४ तास वीजसेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी ग्राहकांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन मालेगाव वीजवितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपलक पाल यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना केले.

मालेगाव वीजपुरवठा कंपनीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना पाल पुढे म्हणाले, ३१ मार्चपासून आम्ही सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. जुन्या व जीर्ण वीजवाहिन्या-ट्रान्सफार्मर बदलले जात आहेत. ग्राहकांना २४ तास वीजसेवा लवकरच उपलब्ध करून देणार आहोत.

लॉकडाऊन काळात वीजेचा वापर गतवर्षापेक्षा ४० टक्क्यांनी वाढला असल्याने सरासरी बीले दिली आहेत. चार महिन्यांसाठी वीज खरेदी करीता कंपनीस १९० कोटी रूपये खर्च आला तर ग्राहकांकडून फक्त २२ कोटींची वसुली झाल्याने सुमारे १६८ कोटी रूपयांचा तोटा आहे. त्यामुळे ग्राहकांनी वेळेवर वीजबिल भरावे, असे आवाहन पाल यांनी केले.

ग्राहकांची तक्रार असल्यास १८००१२११९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. वीजचोरांविरूध्द भरारी पथकामार्फत कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पाल यांनी दिला. पत्रकार परिषदेस विभागीय अधिकारी आर.पी. चक्रवर्ती, शिवाजी बासू, संजीव बारिया, प्रकाश चंदन आदी अधिकारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com