जावयाची गाढवावरुन धिंड

वडांगळीकरांनी जपली वर्षानुवर्षांची अनोखी परंपरा
जावयाची गाढवावरुन धिंड

सिन्नर । वार्ताहर | Siinnar

तालुक्यातील वडांगळी (Vadangali) येथे धुलिवंदन (dhulivandan) ते रंगपंचमी (rangpanchami) दरम्यान जावयाचा शोध घेऊन त्याची मनधरणी करुन गाढवावारुन धिंड काढण्याची अनोखी परंपरा गावाने यंदाही जपली. रंगपंचमीला शेवटच्या दिवशी वडांगळीकरांना जावई मिळाल्याने त्याची गाढवावरून मिरवणूक (Procession) काढून सर्वांनी आनंद लुटला.

होळी (holi) ते रंगपंचमी दरम्यानच्या 5 दिवसांत वडांगळी गावात कुठलाही जावई चुकूनही फिरकत नाही. असा कोणी जावई फिरकलाच तर त्याला पकडून थेट बंदिस्त केले जाते व संपूर्ण गावातुन गाढवावर बसवून त्याची धिंड काढली जाते. त्यामुळे या अनोख्या उत्सवासाठी जावई मिळणे कठीणच असते. त्यामूळे एखादा जावई शोधून त्याला काहीतरी खोटे सांगून गावात आणले जाते. यंदाही गावातील तरुणांना जावई सापडण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.

गावातील बाळासाहेब यादवराव खुळे यांची मुलगी निफाड तालुक्यातील (niphad taluka) चितेगाव (chitegaon) येथे दिली आहे. जावई दौलत बाजीराव भांबरे हे नाशिक (nashik) येथील एका कंपनीत कामाला असून त्यांना जमीन खरेदी करायची आहे. यासाठी त्यांना गावातील काहींनी हिवरगाव येथे जमीन असून तुम्ही बघायला या, असे फसवून तेथे बोलावून घेतले. यानंतर गावातील काही तरुणांनी त्यांना गाठत तुम्हाला तुमच्या सासर्‍यांनी बोलवले आहे सांगून जावयाला थेट वडांगळी येथे आणले. गावात उतरल्यावर गर्दी जमा झाल्याचे पाहून भांबरे यांना काहीतरी भानगड आहे याची जाणीव झाली.

आता आपण पुरते फसलो गेलो याची जाणीव झाल्याने आलेल्या संकटाला तोंड द्यावेच लागेल याची तयारी त्यांनी ठेवली. बळजबरी करू नका, अशी विनंती त्यांनी ग्रामस्थांना केली. पण कोणाचे ऐकतील ते वडांगळीकर कसले? त्यांनी जावयाला सर्व प्रथा व जावयाचा मान किती मोठा आहे, हे भाग्य कोणाच्या नशिबात नसते, हीच सुवर्णसंधी असल्याचे सांगून मिरवणुकीसाठी राजी केले. धनंजय खुळे, मनोज खुळे यांच्यासह काही तरुणांनी सायखेड्यातून अकराशे रुपये भाडेतत्वावर गाढव आणले.

गाढव व जावई असे दोघेही मिळाल्याने मिरवणुकीचा अडथळा दूर झाला. जावयाचा साजशृंगार करुन सुशोभित गाढवावर बसवून मिरवणुकीस धुमधडाक्यात ढोलताशांच्या गजरात, विविध रंग व गुलालाची उधळण करीत प्रारंभ झाला. सुमारे तीन तासांची धमाल करीत मिरवणूक सासरे बाळासाहेब खुळे यांच्या दारासमोर विसावली. अंगणात सडा टाकून, विविध रंगी रांगोळीने आंगण सजले होते. पाटाभोवती नक्षीदार रांगोळी काढली होती. मिरवणूक दाराशी आल्यावर जावयाला सन्मानाने उतरवून पाटावर आंघोळीसाठी बसवण्यात आले.

अंगाला सुगंधी उटणे, साबण लावून सुवासिनींनी गरम पाण्याने स्नान घातले. जावयाला नवीन पोषाख, टॉवेल टोपी देऊन ग्रामस्थांनी प्रेमाने निरोप देऊन त्यांचे आभार मानले. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी गिरीश खुळे, दिलीप खुळे, शुभम खुळे, सचिन खुळे, अजित खुळे, विनोद खुळे, बाळू खुळे, विष्णु खुळे, सुरेश कहांडळ, मंगेश देसाई, शशिकांत खुळे, अश्विनी खुळे, मंदा गायकवाड, रतनबाई खुळे, कल्याणी खुळे, नंदा खुळे यांच्यासह आख्ख्या तरुणाईने परिश्रम घेतले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com