जुन्या नाशकात कही खुशी, कही गम

जुन्या नाशकात कही खुशी, कही गम

जुने नाशिक । प्रतिनिधी Old Nashik

आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने दादासाहेब गायकवाड सभागृहात महिला आरक्षणाची सोडत (Womens Reservation draw for election ) काढण्यात आली. यामध्ये जुने नाशिक भागातील दिग्गजांच्या प्रभागांमध्ये महिला आरक्षण पडल्यामुळे काहींची अडचण झाली आहे तर काही जागा खुल्या झाल्यामुळे काहींच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. विशेष म्हणजे महापौरांच्या प्रभागात अनुसूचित जमातीसाठी पुन्हा महिला राखीव झाले असून प्रभाग 20 मध्ये महिला राखीव असलेले अनुसूचित जाती हे खुले झाले आहे.

तसे पहिले गेले तर मागील काही दिवसांपासून ज्याप्रमाणे आरक्षणाबाबत चर्चा होती, त्याचप्रमाणे आरक्षण पडल्यामुळे मोठे काही फेरबदल होणार असे दिसून आले नाही तर दुसरीकडे हे आरक्षण महाविकास आघाडीला पोषक असल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते करीत आहे. मात्र, कोणत्याही प्रकारे नाशिक महापालिकेत सत्ता पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात राहणार, असा दावा भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

दरम्यान जुना नाशिक भागात अनेक दिग्गजांना धक्का बसण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यामध्ये दुबई प्रभाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या सध्याच्या प्रभाग 14 चे तीन तुकडे झाल्यामुळे विद्यमान नगरसेवकांना विखरून निवडणुकीत उभे राहावे लागणार आहे. यामुळे दिग्गज उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुफी जीन हे सध्या प्रभाग 18 मध्ये चाचणी करीत आहे. त्याचप्रमाणे अपक्ष निवडून आलेले नगरसेवक मुशीर सय्यद हे प्रभाग 17 मध्ये आपले नशीब आजमावणार आहे तर ओबीसी आरक्षण जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या समिना मेमन या प्रभाग 20 मध्ये आपले नशीब आजमावणार असल्याचे बोलले जात आहे.

त्याचप्रमाणे विद्यमान नगरसेविका शोभा साबळे यांची जागा महिला राखीव नसल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा माजी नगरसेवक संजय साबळे हे निवडणूक लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे पाहिले गेले तर जुने नाशिकच्या प्रत्येक प्रभागात अनेक उमेदवार रिंगणात आहे, मात्र विद्यमानांना काही प्रमाणात धक्का बसल्यामुळे त्यांना सेफ जागेचा शोध घेताना अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, प्रभाग अठरामध्ये माजी महापौर तथा शिवसेनेचे नेते विनायक पांडे यांचा मुलगा ऋतुराज पांडे मैदानात उतरणार आहे. या पद्धतीने रूपरेषा आखण्यात आली आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी गटनेता शाहू खैरे, वत्सला खैरे, माजी स्थायी समिती सभापती संजय चव्हाण, मनसेनेचे सचिन भोसले आदींची देखील तयारी आहे.

महिलांचाच अत्यल्प प्रतिसाद

नाशिक महापालिका आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज महापालिकेच्या वतीने मुंबई नाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. एकूण 133 पैकी 67 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या, मात्र सभागृहात उपस्थित यांपैकी दहा टक्के देखील महिला उपस्थित नव्हते, तर राजकीय भाषेत अनेक झेरॉक्स नगरसेवक या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसून आले. एका कार्यकर्त्यांनी तर जोपर्यंत महिलांचा कोरम पूर्ण होत नाही तोपर्यंत आरक्षणाची सोडत करू नये, अशी विनंती सूचना केली. मात्र, महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी विविध कायद्यांच्या हवाला देत ते खोडून काढले. जर हीच परिस्थिती राहिली तर निवडून आल्यावर सभागृहात महिलांचा आवाज कसा बुलंद राहणार, याबाबतची चर्चा सभागृहात सुरू होती.

पारदर्शक पद्धतीने सोडत

2022 मध्ये होणार्‍या महापालिका निवडणुकीसाठी आज महिला आरक्षणाची सोडत महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली झाली. यावेळी प्रशासन उपायुक्त मनोज घोडे पाटील, नगरसचिव राजू कुटे, घनकचरा व्यवस्थापक संचालक डॉ. आवेश पलोड, निवडणूक शाखेचे सचिन विधाते आदी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीमध्ये ही आरक्षण सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाली. महापालिकेच्या विविध चॅनेलवर ही ऑनलाइन पद्धतीने दाखवण्यात आली. शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. दरम्यान हे संपूर्ण सोडत पद्धत अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाल्यामुळे कुठल्याही प्रकारे वाद-विवाद झाले नाही. वेळोवेळी महापालिकेच्या आयुक्त पवार हे लोकांना आवाहन करत होते की आपल्या काही सूचना किंवा हरकती असेल तर आता सांगून द्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com