सामाजिक संस्थांनी जिल्हा परिषदेबरोबर काम करावे - आशिमा मित्तल

- जि.प.तर्फे आयोजित बैठकीत शंभर सामाजिक व औद्योगिक संस्थाचा सहभाग
सामाजिक संस्थांनी जिल्हा परिषदेबरोबर काम करावे - आशिमा मित्तल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने काम करू इच्छिणाऱ्या सामाजिक संस्थांनी पुढे येत जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर यासंदर्भात नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले होते.यास प्रतिसाद देणाऱ्या व ग्रामीण भागात काम करू इच्छिणाऱ्या ७५ सामाजिक व २५ औद्योगिक संस्थांची बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.८) पार पडली. जिल्हा परिषदेतर्फे सामाजिक संस्था आणि औद्योगिक संस्थाची संयुक्त बैठक निवेक क्लब येथे घेण्यात आली.

यावेळी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणा कटिबद्ध आहे. जिल्ह्याचा विस्तार बघता नाशिक जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था या ग्रामीण भागात काम करण्यासाठी इच्छुक असतात. अशा संस्थांनी पुढील काळात जिल्हा परिषदेच्या सोबत काम करावे, उत्कृष्ठ काम करणाऱ्या संस्थांची नोंद घेऊन राष्ट्रीय सणांच्या वेळी अशा संस्थांचा जिल्हा प्रशासनाच्यावतीने गौरव करण्यात येणार असल्याचे मित्तल यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी जिल्हा परिषदेबद्दल माहिती देऊन या आधी जिल्हा परिषदेसोबत काम केलेल्या संस्था व त्यांच्या कामांबद्दल माहिती देत सामाजिक संस्थांना सर्वच विभागांमध्ये काम करण्यास वाव असल्याचे सांगितले.

या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांनी आपल्या विभागांबद्दल माहिती देत सामाजिक संस्थांना आपल्या विभागाशी निगडीत कुठे काम करण्याची संधी आहे, याबद्दल सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी या बैठकीत आपल्या विभागांबद्दल माहिती दिली. याचबरोबर सामाजिक व औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींनी देखील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या संकल्पना मांडल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com