अंत्यविधी ठेक्याच्या नव्या प्रस्तावात 'इतके' टक्के वाढ

अंत्यविधी ठेक्याच्या नव्या प्रस्तावात 'इतके' टक्के वाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील विविध धर्मीय लोकांच्या अंत्यविधीचा खर्च महापालिका उचलते. 2017 पासून ठेकेदाराला जी रक्कम अदा करण्यात येत होती त्यात आता नव्या प्रस्तावात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर त्याचा भार पडणार आहे. सध्या दरवाढीची फाईल महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाकडे गेली आहे. तिथून हिरवा कंदिल मिळाल्यावर नव्या ठेकेदारामार्फत अंत्यविधी तसेच दफनविधीसाठी नवे दर लागू होणार आहेत. सुमारे 44 टक्के दरवाढ करण्यात आली आहे.

नाशिक महापालिका 2001 पासून अंत्यविधीचा खर्च उचलत आहे. यानंतर काही वर्षांनी दफनविधीचा खर्चदेखील महापालिकेने उचलायला सुरुवात केली आहे. दरम्यान, 2017 साली दोन वर्षांसाठी देण्यात आलेल्या ठेक्यात जी रक्कम होती तीच 2022 पर्यंत सुरू होती. त्यामुळे आता नव्याने तीन वर्षांसाठी ठेका देण्याची तयारी महापालिकेने सुरू केली असून त्यात 44 टक्के दरवाढ करण्यात आली आहे.

नाशिक पूर्व तसेच पंचवटी विभागासाठी सध्या एका अंत्यविधीसाठी 2700 रुपये महापालिका ठेकेदारला देते. मात्र नव्या ठेक्यात ही रक्कम 3900 पर्यंत जाणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे दफनविधीसाठीदेखील 3900 रुपये मिळणार असल्याचे समजते. दरम्यान, नाशिकरोड, सातपूर, नवीन नाशिक व पश्चिम नाशिकसाठी दर पूर्वीच अधिक होते. तेथेही आणखी 44 टक्के वाढ होणार आहे. ज्या ठिकाणी कमी अंत्यविधी होते त्या ठिकाणी दर जास्त तर ज्या ठिकाणी जास्त अंत्यविधी होतात त्या ठिकाणी दर कमी असतात.

मागील पाच वर्षांत डिझेलसह इतर सर्व प्रकारच्या वस्तूंमध्ये मोठी दरवाढ झाली आहे. 2017 मध्ये पन्नास रुपयांच्या जवळपास असणारे डिझेल सध्या 100 रुपयांवर गेले आहे. तसेच इतर साहित्यदेखील महागले आहे. त्यामुळे महापालिका नवा ठेका देताना दरात वाढ करणार आहे. याबाबतची फाईल महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाकडे गेली आहे. तेथून फाईल आल्यावर नव्या दरानुसार अंत्यविधी तसेच दफनविधीची रक्कम ठरणार आहे.

तीन नवीन अमरधाम

महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील नवीन नाशिक, पंचवटी तसेच नाशिकरोड विभागात नवीन अमरधाम तयार व्हावे, असा प्रस्ताव दिला आहे. हे नवीन अमरधाम आधुनिक पद्धतीने तयार करण्याचे महापालिकेचे नियोजन असून त्यात इलेक्ट्रिक दाहिनीदेखील राहणार असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com