
नाशिक । प्रतिनिधी Nashik
जनावरांच्या लम्पी आजाराने (Lumpy disease)पशुपालक धास्तावले आहे. या आजारामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 11 जनावरे दगावली आहेत. लम्पीचे 86 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात सिन्नरसह आता इगतपुरी, मालेगाव, चांदवड, बागलाण तालुक्यामध्ये लम्पीने बाधित सर्वाधिक जनावरे आढळली आहेत. जिल्ह्यात एकूण 8 लाख 95 हजार पशुधन असून, त्यापैकी सात लाख 49 हजार 619 जनावरांचे लसीकरण झाले आहे. बाधित जनावरांच्या 5 किलोमीटर परिसरात लसीकरण करण्याचे शासनाकडून आदेश होते. परंतु परराज्य आणि परजिल्ह्यात या आजाराचा संभाव्य धोका बघून सरसकट लसीकरण करण्याचे आदेश प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यात युद्धपातळीवर जनावरांचे लसीकरण सुरू आहे.
तालुकानिहाय लसीकरण (आकडे टक्केवारीत)
बागलाण - 86.98, दिंडोरी- 93.77, देवळा- 98, इगतपुरी - 89.47, कळवण- 85, मालेगाव- 84, नांदगाव 83. 75, नाशिक- 99, निफाड- 96, पेठ- 85.83, सुरगाणा- 76, त्र्यंबकेश्वर- 57, सिन्नर- 97.
आजार नियंत्रणात
नगर, जळगाव, बुलढाणा जिल्ह्यांत सर्वाधिक बाधित जनावरांची संख्या आहे. त्या तुलनेत नाशिकमध्ये ही संख्या नियंत्रणात आहे. लस दिल्यानंतर 21 दिवसांनंतर प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यापूर्वी लम्पी आजार होण्याची शक्यता आहे. परंतु, नाशिक जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने उत्कृष्ट नियोजनात्मक काम सुरू केल्याने आजार नियंत्रणात आहे.