
ओझे | विलास ढाकणे | Oze
दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) गेल्या तीन दिवसापासून ठिकठिकाणी जोरदार वळीव स्वरूपाच्या पावसाने (Rain) हजेरी लावल्याने शेतकरी (Farmer) वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे...
काल सांयकाळी दिंडोरीच्या पश्चिम परिसरामध्ये (Western Area)अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने करंजवण धरणात (Karanjavan Dam) येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरण रात्री ९ वाजेच्या दरम्यान १०० टक्के भरल्याने धरणातून सुरुवातीला ३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कादवा नदीत (Kadava River) सोडण्यात आला. मात्र, धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने येणाऱ्या पाण्याची आवक सतत वाढत असल्याने पुन्हा रात्री ११ वाजता धरणातून १५०१ क्युसेसचा विसर्ग वाढविण्यात आला असून पाण्याची आवक अशीच चालू राहिल्यास करंजवण धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती करंजवण धरण शाखा अभियंता शुभम भालके यांनी दिली.
मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याची आवक घटल्याने पुणेगाव धरणातून (Punegaon Dam) कॅनॉलद्वारे १२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग डवचवाडीकडे सोडण्यात आला आहे. तर पुणेगाव धरण ९७ टक्के भरलेले असून धरणातून उनंदा नदी (Unanda River) सोडलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्याने ओझरखेड धरणाचा (Ozarkhed Dam) पाणीसाठा ९४ टक्क्यांवर स्थिर आहे. तर वाघाड धरण १०० टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यातून काल १५४ क्युसेक्सचा विसर्ग चालू होता. मात्र, रात्री झालेल्या पावसामुळे २६३ पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
तसेच काल रात्री पर्यत पालखेड धरणातून (Palkhed Dam) कादवा नदीत २१८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, करंजवण धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पहाटे ३ वाजता पालखेड धरणातून १७४८ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आलेला असून पालखेड धरणाचा पाणीसाठा ९७ टक्के इतका स्थिर ठेवण्यात आला आहे. तर तीसगाव धरण (Tisgaon Dam) क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे काल ४३ टक्के असलेले तीसगाव धरण ४९ टक्क्यांवर पोहचले आहे. त्यामुळे तीसगाव धरणाला अजून पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
दिंडोरी तालुक्यातील धरणाचा आजचा पाणीसाठा
करंजवण १०० टक्के
पालखेड ९७ टक्के
पुणेगाव ९७ टक्के
वाघाड १०० टक्के
ओझरखेड ९४ टक्के
तिसगाव ४९ टक्के
सध्या तालुक्यात वळीव स्वरूपाच्या पावसाने सुरुवात केल्यामुळे हा पाऊस अचानक कुठे धरण क्षेत्रात पडत असल्यामुळे करंजवण, पालखेड, वाघाड धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे करंजवण,पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा लागत असल्याने कादवा नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कारण पाणी कमी अधिक प्रमाणात सोडल्यास कादवा नदीवरील पुल पाण्याखाली जातात. यासाठी पुलावरून किंवा धरणाजवळून प्रवास करता वाहनधारक किंवा पायी प्रवासी, जनावरे, शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
शुंभम भालके, करंजवण धरण शाखा अभियंता