गारुड्याकडून सर्पमित्राने केली सुटका; जंगलात सोडताना डसला 'कोब्रा'

गारुड्याकडून सर्पमित्राने केली सुटका; जंगलात सोडताना डसला 'कोब्रा'

देवळाली कॅम्प । वार्ताहर Nashik

साप बाळगणे कायद्याने गुन्हा असतानाही एक गारुडी साप बाळगत गावोगावी पैसे जमा करत असल्याचे दिसून आले होते. दरम्यान, गारुडी आल्याचे लक्षात आल्यानंतर सर्पमित्र विक्रम कडाळे यांनी नानेगाव येथे जाऊन या सापाची सुटका केली.

यानंतर या सापाला मूळ अधिवासात सोडण्यासाठी कडाळे हे घेऊन गेले होते. जंगलात सापाला सोडत असताना या सापाने कडाळे यांना चावा घेतला. सुदैवाने या सापाचे विषारी दात काढलेले होते. मात्र, कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्यांनी दवाखान्यात उपचारासाठी धाव घेतली. यामुळे कडाळे बालंबाल बचावले.

अधिक माहिती अशी की, नानेगाव येथे एक गारुडी वारंवार एका पिशवीत साप घेऊन येत असे. येथील नागरिकांना सापाचे दर्शन घडवत पैसे उकळत होता.

याबाबत येथील नागरिकानी सर्पमित्र विक्रम कडाळे यांना फोन द्वारे ही माहिती दिली. त्यानुसार, कडाळे हे गावात पोहोचले. त्यांनी या व्यक्तीकडून कोब्रा जातीचा साप (अंदाजे तीन ते साडेतीन फूट) ताब्यात घेतला.

परत असे करू नका असे सांगत या गारुडीला गावातून जायला सांगितले. तसेच या सापाबद्दल माहीती गावकऱ्यांना सांगितली. तसेच याबाबत असलेल्या अंधश्रध्दाही दूर केल्या.

हा सर्प अतिशय विषारी आहे, मात्र याचे दात काढले असल्याने सदर गारुडी इसम त्यास इतक्या सहजपणे घेऊन फिरत असल्याचेही सांगितले.

सर्प मित्राला घेतला चावा

या व्यक्तीकडून साप जेव्हा सर्पमित्राने ताब्यात घेतला तेव्हा तो अत्यंत शांत होता. पण जेव्हा त्याला सोडायला जंगलात नेले तेव्हा बरणीतून बाहेर काढत असताना त्याने हाताला चावा घेतला.

परंतु, दात काढलेले असल्याने विषारी दंश झाला नाही. पण ज्या ठिकाणी चावा घेतला त्या ठिकाणी थोडीशी सूज आली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून दवाखान्यात स्वतः जाऊन अँडमीट झाल्याचे सर्पमित्र कडाळे यांनी देशदूतला सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com