स्मार्ट हार्डवर्क, प्रामाणिकपणा, जिद्द त्रिसूत्रीचा अवलंब करावा

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
स्मार्ट हार्डवर्क, प्रामाणिकपणा, जिद्द त्रिसूत्रीचा अवलंब करावा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विद्यार्थ्यांनी स्मार्ट हार्डवर्क, प्रामाणिकपणा आणि जिद्द ही त्रिसूत्री अवलंबिल्यास निश्चित ध्येय गाठण्यास कुठलीही अडचण येणार नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच आपले ध्येय निश्चित करत त्या दिशेने पावले टाकावी, असा सल्ला केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड ( Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad)यांनी दिला.असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्स, नाशिकतर्फे रविवारी (दि.8) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक सभागृहात विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी आयोजित विशेष चर्चासत्रात (विद्यार्थी समिट) ते बोलत होते.

डॉ. कराड, खा. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. किशोर दराडे, धुळे महापालिकेचे महापौर नानासाहेब कर्पे, राज्याचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, केंद्रीय अबकारी कर उपायुक्त विवेकानंद जाधव, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अ‍ॅड.जयंत जायभावे, शहर अभियंता नितीन वंजारी, सर्वोच्च न्यायालयाचे वकील अरविंद आव्हाड, सीईओपीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते, वृत्त निवेदक विलास बडे, रावसाहेब घुगे, असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्सचे अध्यक्ष उदय घुगे, उपाध्यक्ष प्रशांत आव्हाड, सचिव नीलेश ढाकणे, खजिनदार अविनाश आव्हाड,सचिव वैभव आव्हाड,अशोक कुटे हे उपस्थित होते.

डॉ. कराड म्हणाले, वुई प्रोफेशनल्स ने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यासाठी वक्ते म्हणून प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ आले आहेत आणि त्यांना ऐकण्यासाठी तरुण, विद्यार्थी आला आहे. आता हे कार्यक्रम फक्त नाशिकमध्येच नको तर महाराष्ट्रभर करावा, असा सल्ला दिला.

खा. डॉ. मुंडे म्हणाल्या, महापुरुषांचा सन्मान करणे गरजेचे आहे. मात्र, जातीचे लेबल लावायला नको. माणसांच्या गुणावर प्रेम करा, पण इतर जातीचा वा माणसांचा अवमान करू नका. ज्या आई-वडिलांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांचे नाव पुढे न्या असा सल्ला देत त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा व मेहनतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे सांगत डॉ. मुंडे यांनी वुई प्रोफेशनल्सच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राज्याचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, शेतकर्‍याचा मुलगा देशातील सर्वात मोठी सनदी परीक्षा पास होतो आणि आयएएस होतो, हे सिद्ध झाले आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी लहान वयातच प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे.

अ‍ॅड. जायभावे म्हणाले, केवळ जातीच्या नावाखाली पुढे जाता येत नाही तर स्वकर्तृत्वाने पुढे जाता येते. असा प्रयत्न आजच्या विद्यार्थ्यांनी करावा. राहुल कराड म्हणाले, वुई संस्थेने 50 विद्यार्थ्यांची यादी आपल्या संस्थेकडे द्यावी, या विद्यार्थ्यांचा 12 दिवसांचा दिल्लीत नॅशनल स्टडी टूर करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविकात अध्यक्ष उदय घुगे यांनी वुई प्रोफेशनल्सच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com