नाशिक । Nashik

सीबीस जवळील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे स्मार्ट सिटी कंपनीचा भुयारी पार्किंगचा प्रस्ताव व तयारी याबाबत सावळा गोंधळ असल्याचे माहितीच्या आधिकारात उघडकीस आले असून प्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी क्रीडा संघटनांनी केली आहे.

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. अर्थात स्मार्ट सिटी कंपनीने जिल्हा परिषदेच्या मालकीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर भुयारी पार्किंग प्रस्तावित केले होते. ही बाब लक्षात येताच जिल्हाभरातील विविध क्रीडा संघटना, खेळाडू तसेच नाशिककरांनी यास काडाडून विरोध केला आहे.

या बाबत छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अविनाश खैरनार यांनी माहितीच्या अधिकारान्वये माहीती घेतली असता स्मार्ट सिटी कंपनीकडुन जनमाहिती अधिकारी तथा मुख्य नगररचनाकार यांनी माहीती दिली. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे होणारा प्रस्तावित भुयारी पार्किंगचा विषय कंपनीच्या संचालक मंडळ सभेपुढे आलेलाच नाही तरी अधिका-यांनी त्यांच्या अख्यात्यारित हा विषय रेटुन नेल्याचे समोर आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे होणारा प्रस्तावित भुयारी पार्किंगचा नकाशा तयार केलेला नाही असे असतांनाही कंपनीने 121 कोटीचे अंदाजपत्रक तयार केले आहे. ते कशाच्या आधारे केले याचा उलगडा होत नाही. कंपनीचे कामकाज भोंगळपध्दतीने चालू आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने जर हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे होणारा प्रस्तावित भुयारी पार्किंगचा विषय रेटुन नेला तर नाशिकच्या क्रीडा संघटना न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे खैरनार यांनी सांगितले.