तपोवन गोदापात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू

तपोवन गोदापात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू

पंचवटी | Panchavti

शहरात स्मार्ट सिटीद्वारे गोदापात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे मनपाने तपोवनातील गोदापात्रात साचलेला गाळ व माती काढण्याचे काम सुरू आहे.

काही ठिकाणी येथील खडक फोडून पाण्याचा प्रवाह प्रवाहित करण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे तपोवनातील उद्यानासह इतर भागाला पूराचा पाण्याचा तडाखा बसण्यापासून वाचविता येईल असे प्रयत्न केले जात आहेत.

बडा लक्ष्मीनारायण पूल ते कपिला संगम हा गोदापात्राचा भाग रुंद आहे. या पात्राच्या उत्तरेला रामसृष्टी उद्यान विकसित करण्यात आलेले आहे.

या रामसृष्टी उद्यान व गोदापात्र यांच्यामध्ये सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचा घाट बांधण्यात आलेला आहे. या घाटाच्या समोरच्या भागातील गोदापात्र हे रुंद असून त्यातील अर्धाअधिक भागात पाण्यात वाढणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती अंत्यत दाट वाढलेल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रवाह हा दक्षिणेच्या बाजूला वळसा घेऊन पुढे कपिला संगमाकडे जातो.

पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या भागातील पाण्याचा फुगवटा होऊन पाणी थेट रामसृष्टी उद्यानातून तपोवनाच्या कपिलासंगमाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाहू लागते.

हे टाळण्यासाठी येथे गोदापात्र खोल करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. पोकलन मशीनच्या साह्याने या पात्रातील गवत आणि गाळ काढण्यात येत आहे.

सध्या हे काम वेगाने सुरु आहे. गवत आणि गाळ निघाल्यानंतर येथील पाण्याचा प्रवाह वेगाने कपिला संगमाकडे जाणार असल्याने गोदावरीच्या नदीच्या पाण्याची पातळी वाढली तरी या परिसरात बसणारा पूराचा धोका कमी होणार असल्याचे बोलले जात आहे.

कपिला संगमाच्या भागात पाणी पडण्याच्या जागेत असलेला खडक फोडून तेथील पाणी अधिक प्रवाहीत केले जाणार आहे. त्यामुळे या भागात पाणी साचून त्यापासून होणाऱ्या डासांच्या प्रादुर्भावाच्या अडचणी दूर होणार आहेत. तर दुसरीकडे सध्या रामसृष्टी उद्यानाची लाखो रुपये खर्च करून डागडुजी झाली असल्याने, या उद्यानाचे रुपडे पालटले आहे.

येथील लांबलचक घाट आणि गोदावरी नदीचे विस्तार्ण पात्र यामुळे हा परिसर भविष्यात मोठया संख्येने पर्यटक कसे येतील या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com