दाभाडी-मालेगाव रस्ता कामात कासवगती; अपघातात वाढ

दाभाडी-मालेगाव रस्ता कामात कासवगती; अपघातात वाढ

पिंपळगाव । वार्ताहर | Pimpalgaon

दाभाडी ते मालेगाव (Dabhadi to Malegaon road) रस्ता रूंदीकरणाचे (Road widening) काम अत्यंत धिम्यागतीने सुरू असल्याने अपघातांसह (accidents) वाहतूक कोंडीने (Traffic jam) वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने रस्त्याच्या कामास गती द्यावी, अशी मागणी परिसरातील वाहनचालकांसह शेतकरी (farmers) व ग्रामस्थांनी केली आहे.

दाभाडी ते मालेगाव रस्ता काँक्रीटीकरण (Road concreting) व रूंदीकरणाची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती. अखेर कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांच्या प्रयत्नाने सुमारे एक वर्षापूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरवात झाली. रस्त्याचे काम दर्जेदार होत आहे. मात्र, ते अत्यंत संथगतीने सुरू आहे. गेल्या महिन्यात रस्त्याचे काम बरेच दिवस बंद होते. ठिकठिकाणी केलेल्या खोदकामामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याचे काम त्वरीत सुरू करण्याच्या जोरदार मागणीनंतर काही दिवसांपासून कामास पुन्हा सुरवात झालेली आहे. तथापि हे काम कासवगतीने होत आहे.

सटाण्याला (satana) जाण्यासाठी हाच मार्ग असून तालुक्यातील दाभाडी, पिंपळगाव, रावळगाव, आघार, जळगाव गा. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांचा दैनंदिन मालेगावशी (malegaon) संपर्काचा हा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. यास्तव रस्त्याचे काम (road work) शिघ्रगतीने होणे आवश्यक आहे. संबंधित विभाग मात्र संथगती कायम ठेऊन असल्याने वाहनचालक व परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. रस्त्याच्या दक्षिणेकडील काही भागाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून काही काम अद्यापही अपूर्णावस्थेच आहे.

सध्या उत्तरेकडील भागाचे काम हाती घेण्यात आले असून ते अतिशय धिम्यागतीने केले जात आहे. जुना रस्ता जेसीबीच्या सहाय्याने उखडून मजबूतीकरण केले जात असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे (potholls) व बाजूला मातीचे ढिगारे साचले आहेत. त्यामुळे धूळ उडून वाटसरूंच्या आरोग्याला बाधा पोहोचत आहे. शिवाय डोळ्यात धूळ गेल्यामुळे दुचाकीस्वार जागीच थांबत असल्याने मागून येणार्‍या वाहनाची धडक बसून अपघात घडतात. रस्त्याच्या परिस्थितीमुळे लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले असून त्यामुळे आतापर्यंत अनेक दुचाकीस्वार जायबंदी झाले आहेत.

अनेक ठिकाणी अघोषित एकमार्गी वाहतुकीचा प्रत्यय वाहन चालकांना येत असल्याने तासन्तास वाहतुकीचा खोळंबा होतो. सटाणामार्गे गुजरातकडे जाणार्‍या अवजड वाहनांची वाहतूक देखील याच मार्गाने मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने वाहतूक कोंडी व बाचाबाचीचे प्रकार घडून वाहनचालकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. हा रस्ता प्रचंड रहदारीचा असल्याने युध्दपातळीवर रस्त्याचे काम होणे गरजेचे असताना अवघ्या नऊ कि.मी. असलेल्या या रस्त्याचे काम वर्षभरापासून सुरू असून ते अद्यापही पूर्ण होत नसल्याबद्दल परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संबंधित विभागाने रस्त्याच्या कामास गती द्यावी, अशी मागणी दाभाडी, पिंपळगाव, आघार जळगाव गा. परिसरातील वाहनचालकांसह शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.