पीक कर्जाचे वाटप कासवगतीने
नाशिक

पीक कर्जाचे वाटप कासवगतीने

उद्दिष्ट ३३०० कोटी ; वाटप १ हजार २०९ कोटी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

खरीप हंगाम सुरु होऊन दोन महिने लोटले असताना पीक कर्ज वाटपाचे पन्नास टक्के देखील उद्दिष्ट बॅकांनी गाठले नसल्याचे समोर येत आहे. यंदा 3 हजार 300 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आता पर्यंत 1 हजार 209 कोटींचे वाटप झाले आहे. राष्ट्रीयकृत बँका कर्ज वाटपात टाळाटाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

करोना संकटामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत आला आहे. खरिप हंगामात पेरणीसाठी बी- बियाणे खरेदी, खते आदींसाठी शेतकर्‍यांना पैशाची गरज होती. ते बघता बँकांनी शेतकर्‍यांची अडवणूक न करता त्यांना कर्ज द्यावे असे आदेश शासनाने दिले होते. यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांसाठी 3 हजार 300 कोटींचा कर्ज वाटपाचा आराखडा तयार करण्यात आला.

जिल्हाधिकारी दर बुधवारी बैठक घेऊन कर्ज वाटपाचा आढावा घेतात. पीक कर्ज वाटपाची कासवगती लक्षात घेता वेग वाढावा असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी बँकांना दिले होते. तरी देखील बँका शेतकर्‍यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. खरिपाचे दोन महिने लोटले तरी फक्त एक हजार 209 कोटींचे वाटप होऊ शकले. 39 हजार शेतकर्‍यांनी पीक कर्जाचा लाभ घेतला आहे. अद्याप हजारो शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहे. अद्याप 50 टक्के देखील कर्ज वाटप होऊ शकले नाही.

जिल्हा बँक, पतसंस्था व सहकारी सोसायटया शेतकर्‍यांना पिक कर्ज सुलभरित्या वाटप करत आहे. मात्र, राष्ट्रीयकृत बँका कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्‍या बँकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

पीक कर्जाचे वाटप अधिक गतीने होण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली पीक कर्ज वाटपाबाबत आढावा बैठक घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यानी दिले आहेत. पुढील आठवड्यापर्यंत 300 कोटी पर्यंतचे कर्ज जिल्ह्यात वाटप करावे, अशा सूचना सर्व बँकर्सला देण्यात आल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com