मालेगाव मनपास 'स्कॉच गोल्ड' पुरस्कार जाहीर

मालेगाव मनपास 'स्कॉच गोल्ड' पुरस्कार जाहीर

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

करोना उद्रेकावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात मनपा प्रशासन यंत्रणा विशेषत: आरोग्य विभागाने घेतलेल्या परिश्रमास यश आले असल्याने बाधीत रूग्णांची तसेच मृतांची संख्या खुपच कमी झाली आहे. करोना नियंत्रणात आणण्याच्या या कामाची चर्चा दिल्लीपर्यंत पोहचली आहे. नवीदिल्लीतील स्कॉच ग्रुप या संस्थेतर्फे करोनाचे सावटातून शहरास बाहेर काढणार्‍या मनपास 'स्कॉच गोल्ड अ‍ॅवार्ड 2020' हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नवीदिल्ली येथे संस्थेतर्फे लवकरच या पुरस्काराचे वितरण मनपास केले जाणार असल्याची माहिती आयुक्त त्र्यंबक कासार यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना दिली. दिल्लीच्या स्कॉच ग्रुपतर्फे दरवर्षी देशातील विविध महापालिकांनी केलेल्या कामाच्या आधारावर स्कॉच गोल्ड अ‍ॅवार्ड हा पुरस्कार दिला जातो. करोनाने संपुर्ण देशात धुमाकुळ घातला आहे. 8 एप्रिलला मालेगावी पहिला रूग्ण आढळून आला. यानंतर बाधितांची संख्या कमालीची वाढल्याने मालेगाव करोना हॉटस्पॉट ठरले होते. मात्र मनपा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने या संकटाचा धैर्याने मुकाबला गेला.

आयुक्त त्र्यंबक कासार यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागाच्या अधिकारी, सेवकांनी नियोजनबध्दरित्या काम केले. विविध उपाययोजनांना जनतेकडून देखील मिळालेला प्रतिसाद तसेच पोलीस, महसूल आदी विविध विभागांकडून मिळालेल्या सक्षम साथीमुळे आरोग्य विभागास योजना प्रभावीपणे राबविता आल्याने करोनावर नियंत्रण प्रस्थापित करता आले होते. इतरत्र बाधीत रूग्ण वाढत असतांना मालेगाव शहरात मात्र ही संख्या कमालीची घसरली आहे. त्यामुळे करोनाची स्थिती मनपाने कशी हाताळली या संदर्भात स्कॉच संस्थेतर्फे दोनदा पाहणी व माहिती घेण्यात आली होती. करोनावर नियंत्रणासाठी केलेल्या कामाची दखल घेत मनपाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा मनपाबरोबर संपुर्ण शहराचा सन्मान असल्याचे आयुक्त कासार यांनी पुढे बोलतांना सांगितले.

दिल्ली येथील संस्थेने करोनावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या कामाची नोंद घेत दिलेल्या पुरस्काराने आगामी काळात खुपच प्रोत्साहन मिळणार असल्याची भावना आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी व्यक्त केली.

मनपास पुरस्कार जाहीर झाल्याचे माहिती मिळताच महापौर ताहेरा शेख रशीद, उपमहापौर निलेश आहेर, स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, सुनिल गायकवाड, मदन गायकवाड, डॉ. खालीद परवेज, संजय काळे आदींसह नगरसेवकांनी तसेच विविध विभागाच्या अधिकार्‍यांनी आयुक्त कासार यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com