जिल्ह्यात साठ टक्के रस्त्यांची कामे पूर्णत्वास

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना : पाच वर्षांत 39 कोटी
जिल्ह्यात साठ टक्के रस्त्यांची कामे पूर्णत्वास

नाशिक । वैभव कातकाडे

राज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत (Pradhan Mantri Gram Sadak Yojana ) मंजूर होऊ न शकणार्‍या वाड्या वस्त्या जोडण्यासाठी व सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दर्जा वाढीसाठी राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (Mukhyamantri Gram Sadak Yojana ) ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी 60 टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत तर 40 टक्के कामे प्रगतीपथावर आहेत. गाव स्तरावर येत असलेल्या अडचणींमुळे ही कामे खोळंबली असल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात सन 2015-16 ते 2019-20 या काळात 196 कामे मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी 118 कामे आजवर पूर्ण झाली आहेत तर 64 कामे प्रगतिपथावर ( Rod Work in Progress ) आहेत. लवकरच ही कामे पूर्ण होऊन गावे वाड्या वस्त्या जोडल्या जाणार आहेत.

ग्रामीण भागातील वाड्यापाड्यांवरील रस्ते मुख्य रस्त्यांपर्यंत जोडणार्‍या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे चार वर्षांपासून सुरु आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत ही योजना सुरू करण्यात आली होती. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत इतर जिल्हा मार्ग प्रमुख मार्गाला जोडणारी योजना असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत गाव, वाडी-वस्त्यांना जोडणारी कामे केली जातात. त्यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी आर्थिक तरतूद

केली जाते. मात्र, यामध्ये अनेक अडचणी येत असल्याने विलंब होत आहे. यात प्रामुख्याने गाव, वाडी-वस्त्यांना जोडणार्‍या या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांसाठी जमिनीचा वाद आडवा येत आहे. ग्रामीण भागात रस्त्यांसाठी शेतजमिनीची जमीन देण्यास शेतकर्‍यांचा विरोध असल्यामुळे कामे करण्यात अडचणी येतात. यासाठी सध्या 39 कोटी रुपये खर्चाचे आव्हान आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात येणार्‍या कामांसाठी गेल्या पाच वर्षात राज्य सरकारकडून 39 कोटी, 33 लाख 9 हजार रुपये मंजूर करण्यात आले असून, त्यातील बरीचशी रक्कम खर्च झाली आहे. अडचणींचा सामना करत आतापर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण भागात 712 किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. तर 244 किलोमीटरच्या रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या वर्षभरात ते पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com