शेतकरी आत्महत्या
शेतकरी आत्महत्या
नाशिक

१८ पैकी सहा शेतकरी आत्महत्या दावे मदतीस पात्र

Kundan Rajput

नाशिक । Nashik

चालू वर्षात जिल्ह्यात जुलै पर्यंत १८ शेतकर्‍यांनी आत्महत्या करुन जीवन संपवले आहे. जिल्हा प्रशासनाकडून या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून १८ पैकी सहा प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरले आहे. त्यांच्या वारसाना एक लाख रुपयांची मदत दिली जाणार अाहे. तर चार प्रकरणे फेटाळण्यात अाली अाहे. सर्वाधिक चार आत्महत्या बागलाण व प्रत्येकी तीन आत्महत्या नाशिक व दिंडोरी तालुक्यात झाल्या आहेत.

जिल्हा प्रशासन करोना संकटाशी दोन हात करत असून सर्व यंत्रणा त्याविरुध्द रात्रंदिवस एक करत आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाय योजनांमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आलेख खालावला असून हे करोना संकटात दिलासादायक चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत बळीराजाने नानाविध कारणांनी आत्महत्या करण्यापेक्षा जिद्दीने उभे राहात आलेल्या समस्येला तोंड देण्याची हिम्मत दाखविली आहे. गतवर्षी वर्षभरात ६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. यंदा ही संख्या जुलै अखेरपर्यत १८ इतकी आहे. त्यापैकी ६ आत्महत्या या कर्जबाजारी कारणातून झाल्याने त्यांना मंजूरी देत शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. कर्जबाजारारी कारणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाच सहानुभूती म्हणून शासनाकडून मदतीपोटी १ लाख रुपये दिले जातात. परंतू अनेकदा आत्महत्यांची भलतीच कौटुंबिक कारणे असतात, आणि शासकीय मदत मिळावी म्हणून ती शेतकरी आत्महत्या दाखविली जात असल्याने गत अनेक वर्षातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या सखोल चौकशीनंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे असे आत्महत्याग्रस्त शेतकरी हे मदतीस पात्र ठरत नाही.

त्यानुसार यंदा १८ आत्महत्येची प्रकरणे जिल्ह्यात घडली आहे. त्यापैकी ६ शेतकऱ्यांनीच केवळ कर्जबाजारीपणातून आपले जीवन संपविल्याचे स्पष्ट झाले आहे. तर चार आत्महत्येची प्रकरणे मदतीस अपात्र ठरविण्यात आली असून उर्वरित दोन प्रकरणे ही फेर चौकशीसाठी त्या-त्या तालुक्यांतील तहसीलदारांकडे पाठविण्यात आली आहे. आत्महत्येची एकूण आठ प्रकरणे प्रलंबित आहे.

शेतकरी आत्महत्या

जानेवारी - ४

फेब्रुवारी -४

मार्च - २

एप्रिल -१

मे -२

जून - ४

जुलै - १

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com