वावी । Vawi

सिन्नर - शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सद्या झपाट्याने सुरु असून कामाबाबत संबंधित ठेकेदार चालढकल करत असून रस्त्याच्या बाजुने होत असलेल्या साईड गटारीचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप वावी ग्रामस्थांनी केला आहे.

या महामार्गाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावरील साचणार्या पाण्या साठी गटारीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र संबंधित ठेकेदार केवळ पाईप टाकून त्याबाबत कुठलाही उतार चढ देण्याबाबत नियोजन करत नसून केवळ पाईप टाकून त्यावर मलमपट्टी करण्याचे काम संबंधित ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे.

रस्त्याच्या बाजूला मोठमोठाली गटारीचे पाईप टाकले आहेत. मात्र पाईप टाकतांना त्यास उंची किंवा खोली तसेच रस्त्याचे पाणी जाणार कसे, पाण्याचा निचरा कसा होणार होणार याबाबत कुठलेही नियोजन नाही. या पाईपवर हलक्या दर्जाचे सिमेंट वापरून काम पूर्ण करत आहे. याबाबात वावी येथील सरपंच कन्हैयालाल भुतडा, विजय काटे यांनी या कामाबाबत शंका उपस्थित करत संबंधित अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीकडे ग्रामपंचायत हद्दीतील आराखडा मागितला.

मात्र सबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. निकृष्ठ काम सुरूच असून सबंधित विभागाच्या शासकीय अधिकार्यांनी कामाच्या गुणवत्तेची पाहणी करून तत्काळ उपाययोजना कराव्यात. अशी मागणी सरपंच भुतडा, ग्रा. प. सदस्य संदीप राजेभोसले. ग्रामस्थ विनायक घेगडमल, अनंत मालपाणी, सचिन वेलजाळी, सुनिल काटे, विजय गायकवाड, कचरू घोटेकर यांनी केली.

वावी ग्रामपंचायत हद्दीत सध्या महामार्गावरील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी गटारीचे काम सुरु आहे. या कामाचा ग्रामपंचायत हद्दीतील कृती आराखडा मागितल्यावर संबंधित शासकीय अधिकारी ठेकेदार कंपनीचे नाव सांगून उडवा उडवीचे उत्तरे देत आहेत. याबाबत शहानिशा करून कामाचा दर्जा वाढवावा.

-कन्हैयालाल भुतडा, सरपंच