सिन्नरच्या जवानाचा सिक्कीम येथे मृत्यू

चिंचोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सिन्नरच्या जवानाचा सिक्कीम येथे मृत्यू

सिन्नर | Sinnar

तालुक्यातील चिंचोली येथील सैन्य दलातील जवान अमोल रामनाथ झाडे यांचा सिक्कीममध्ये आजाराने मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.15) चिंचोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

बालपणापासूनच सैन्यात भरती होण्याची आवड असलेला अमोल वयाच्या अठराव्या वर्षी सैन्य दलात भरती झाले होते. त्यांचे शिक्षण चिंचोली आणि सिन्नरमध्ये झाले. आईने त्यांना आणि त्यांच्या सिन्नरमधील कंपनीत कामाला असलेल्या बंधूला काबाडकष्ट करून शिकवले. कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीड वर्षात त्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा कालावधी संपणार होता.

सद्या ते सिक्कीम येथे मराठा बटालियनच्या तुकडीत सेवा बजावत होते. आजारी असल्याने सिक्कीम येथे मिलिटरी च्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यानंतर आज (दि.15 ) सकाळी त्यांचे शव मूळ गावी चिंचोली येथे आल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देवळाली येथील मिलिटरी अधिकाऱ्यांसह तहसीलदार राहुल कोताडे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, माजी सरपंच संजय सानप, राजू नवाळे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.

अमोल यांच्या आकस्मित जाण्याने चिंचोली गावासह सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, सव्वा वर्षाची कन्या, आई, ,भाऊ असा परिवार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com