सिन्नर : रिंग प्लस ऍक्वातील लढा यशस्वी
नाशिक

सिन्नर : रिंग प्लस ऍक्वातील लढा यशस्वी

दोन दिवस कामगारांनी केले होते काम बंद आंदोलन

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर | प्रतिनिधी

महिण्यातील 26 दिवस काम करून सुध्दा संपूर्ण वेतन देण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ रिंग प्लस ऍक्वा कंपनीतील कामगारांनी क्रांतीदिनापासून सुरु केलेल्या आंदोलनाला यश आले असून ऑगस्ट महिण्यापासून पूर्ण पगार देण्यास व्यवस्थापनाने मंजूरी दिल्याने कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

जगभर करोनाचे संकट सुरु झाल्यापासून देशात केंद्र शासनाने लॉकडाऊन लागू केला होता. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर शासनाने कारखान्यांना उप्तादन सुरु करण्यास परवानगी दिली होती. त्याच वेळी लॉकडाऊनच्या काळातील वेतन न कापण्याबाबतही शासनाने सुचना केल्या होत्या. त्यानंतर रिंग प्लस ऍक्वाचे कामगार महिण्यातील 26 दिवस काम करीत असतानांही व्यवस्थापन गेल्या चार महिण्यांपासून कामगारांना 50 ते 70 टक्के पगार देत होते. याबाबत अनेकदा व्यावस्थापनाबरोबर चर्चा करून, निवेदन देऊन प्रश्र्न सोडविण्याचा कामगार युनियनने प्रयत्न केला. मात्र, व्यावस्थापन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. लेखी पत्र देऊनही व्यावस्थापन चर्चा करत नव्हते.

डॉ. डी.एल. कराड यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करुनही व्यवस्थापन दाद देत नसल्याने कामगारांनी क्रांतीदिनी काम बंद आंदोलन सुरु केले. दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच राहील्यानंतर व्यवस्थापन नरमले आणि युनियनच्या प्रतिनिधींशी चर्चेला तयार झाले.

डॉ.कराड यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत ऑगस्ट महिन्यापासून 100 % पगार देण्यात येईल व माहे मे,जून व जुलै 2020 या महिन्यांचे थकित वेतन डिसेंबर 2020 किंवा जानेवारी 2021 मध्ये देण्याचे मान्य केले. तसेच पगारवाढीच्या डिसेंबर 2019 मध्ये संपलेल्या कराराबाबत लवकरच बोलणी करण्यासही व्यवस्थापनाने संमती दिली.

त्यामुळे कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी झालेल्या चर्चेत व्यवस्थापनाकडून प्लांट हेड कमलाकर टाक, अस्थापना व्यवस्थापक देवेंद्र अकोलकर, नंदू थोरात, युनियनकडून हरीभाऊ तांबे, सुर्यभान थोरात, दत्तात्रय चव्हाणके, बाबासाहेब पांगारकर, अशोक भांबर, सुभाष सावंत यांनी भाग घेतला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com