सिन्नरतालुका वार्तापत्र: सिन्नर पोलिसांना झाले तरी काय?

सिन्नरतालुका वार्तापत्र: सिन्नर पोलिसांना झाले तरी काय?

सिन्नर | विलास पाटील | Sinnar

ग्रामपंचायतच्या माजी सदस्याला सिनेस्टाईल अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले जातात. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या फर्निचरच्या दुकानातील फर्निचर (Furniture) भरुन पिकअप फरार होते.

पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांच्या (police) साक्षीने एकाला बेदम मारहाण होते. तरीही सिन्नरचे पोलीस (sinnar police) बघ्याची भूमिका घेतात. ज्यांनी कायदा व सुव्यवस्थेची (Law and order) काळजी घ्यायची, ज्यांचा धाक गुन्हेगारांना वाटला पाहिजे त्या पोलिसांच्या गळ्यात हात घालून गुन्हेगार (Criminals) पोलीस ठाण्यात फिरत असतील तर पोलिसांच्या राज्यात सर्वसामान्य सिन्नरकर (sinnar) सुरक्षित कसा राहू शकेल? शहरासह तालुक्यात पोलिसांचे अस्तित्व कुठे दिसत नसून नेमके पोलिसांना झाले तरी काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

तालुक्यातील विंचूर दळवीचे माजी ग्रामपंचायत सदस्य बुलेटवर बसून मळ्यात चक्कर मारण्यासाठी जात असताना रस्त्यात ट्रॅक्टर आडवा लावला जातो. काही मिनिटातच स्कॉर्पिओने काही लोक येतात आणि धारदार शस्त्राने सदस्यावर सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केल्यानंतर काही घडलंच नाही अशा थाटात निघून जातात. असं चित्र अनेक हिंदी चित्रपटांमध्ये बघायला मिळतात. यूपी, बिहारमध्ये अशी गुंडागर्दी आपण ऐकली आहे. मात्र, महाराष्ट्रही आता अशा घटनांमध्ये मागे नाही हे दाखवणारी घटना विंचूर दळवीत घडली.

शरीरावर अनेक वार झेलणारा माजी ग्रामपंचायत सदस्य खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय. मात्र, मारेकरी पोलिसांना सापडत नाही ही शोकांतिकाच म्हणावी की पोलिसांचा नाकर्तेपणा? नेमकी सिन्नरची वाटचाल कोणत्या दिशेने चालली आहे? सरदवाडी परिसरातील उपनगरांमध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांची चोरी आता नवी बाब राहिली नाही. घरापुढे लावलेली इर्टीका कार चोरटे बिंधास चोरून नेतात. सहा-सहा महिने उलटूनही पोलिसांचा तपास सुरु आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर अमित स्टील फर्निचरचे दुकान आहे.

चोरटे रात्री दोनच्या दरम्यान बिंधास पिकअप घेऊन येतात आणि पिकअप भरून फ्रीज, कुलर घेऊन जातात. तरी पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागत नाही. शहरासह उपनगरांमध्ये अनेकांच्या घरांमध्ये चोर्‍या झाल्या. मात्र, आजपर्यंत एकाही चोरट्याला सिन्नर पोलीस पकडू शकले नाही. बसस्थानकाच्या आवारातच सोन्याच्या नावाखाली महिलेला लुटल्यानंतरही त्यांची फिर्याद घेण्याऐवजी पोलीस ठाण्यात त्यांना बसवून ठेवले जाते. शहराच्या विविध भागात महिलांच्या गळ्यातील पोत ओरबडण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. तरीही गुन्हा दाखल करण्यासाठी ज्यांना घाई नाही, ते पोलीस तपास काय वेगाने होणार?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने देशभरातल्या प्रत्येक पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असताना पोलीस ठाण्याच्या भिंतीलगत 30 एप्रिलला सोनारीच्या मामाला त्याचाच भाचा निर्दयपणे मारझोड करत लाथाबुक्क्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत तुडवतो. खिडक्यांमधून पोलीस हा सर्व तमाशा बघत असतात. तरीही एकही पोलीस मामाला सोडवण्यासाठी जात नाही. मामाबरोबर असणारी एक महिला धावत पळत पोलीस ठाणे गाठते. तेव्हा 1-2 पोलीस निवांत येतात. मारणारा भाचा हा पोलिसांचा मित्र असतो.

तो या पोलिसांना बघ्याच्या गर्दीसमोर अरेरावी करतो तरी पोलिसांचा स्वाभिमान जागा होत नाही. मार खाणारा विव्हळत असतो. त्याला उठून दवाखान्यात नेण्याचे अथवा पोलिस ठाण्यात नेण्याची हिम्मतही पोलीस दाखवू शकत नाही. भाच्याची अरेरावी वाढल्यानंतर हे पोलीस तेथून काढता पाय घेतात. महिलेची फिर्याद लिहून घेण्याची भाषा करतात.

नंतर भाचा पोलीस ठाण्यात येऊन उपनिरीक्षकांना मिठी मारत अभिमानाने उचलून धरत आपले पोलिसांशी किती सख्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. या अधिकार्‍यासह पोलिसही ओशाळल्यासारखे करणार असतील तर गुन्हेगारांवर ते काय वचक ठेवणार? पोलीस ठाण्यातच अशी अबाळ असेल तर शहराचं न विचारलेलं बरं! सदैव गर्दीने फुललेल्या नाशिक वेशीतल्या भाजीबाजारातुन मोटरसायकल पळून नेण्याची हिम्मत त्यातूनच चोरट्यांना मिळते.

सिन्नर शहरात पोलिसांचे अस्तित्व दिसतें कुठे? बसस्थानकासमोरचा परिसर हा कायमच गर्दीने फुललेला असतो. वडापाव, मिठाई, वाइनशॉपमध्ये खरेदी करण्यासाठी आपली वाहने कशीही वाकडी तिकडी लावली आणि त्यातून वाहतूक कोंडी झाली तरी लवकर पोलिस तेथे दिसणार नाही. नाशिक वेस ते गंगावेस भागात संपूर्ण रस्ता भाजी विक्रेत्यांनी खरेदी केल्याच्या अविर्भावात रस्त्यावरच दुकाने थाटली जात असतानाही पोलीस बघ्याची भूमिका घेणार असतील तर त्यांच्या हातात सिन्नरकर कसे सुरक्षित राहणार असा प्रश सर्वसामान्य सिन्नरकरांना पडत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com